ग्रामीण महिला उद्योजिकांची भरारी; स्वयम् प्रकल्पातून ४६.९८ लाखांची विक्रमी उलाढाल

कन्साई नेरोलॅक आणि दिशान्तरच्या संयुक्त उपक्रमातून महिला उद्योजकतेला नवी दिशा

चिपळूण (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील महिलांच्या उद्योजकीय कौशल्याला व्यासपीठ मिळाल्यास त्या आर्थिक स्वावलंबनाची नवी शिखरे गाठू शकतात, याचा प्रत्यय कन्साई-नेरोलॅक पेंट्स लिमिटेड आणि दिशान्तर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘स्वयम्’ प्रकल्पातून आला आहे. या प्रकल्पातील महिला उद्योजिकांनी विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून तब्बल ४६ लाख ९८ हजार १२१ रुपयांची उलाढाल नोंदवित महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
ग्रामीण तसेच शहरी-निमशहरी भागातील महिलांना उद्योग-व्यवसायात प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षापासून ‘स्वयम्’ प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत महिला उद्योजिकांना ब्रँडिंग, पॅकेजिंग, लोगो डिझाइन, सोशल मीडिया, मार्केटिंग, शासकीय परवानग्या, नियमावली तसेच शासकीय योजनांमधून कर्जप्रकरणे याबाबत मार्गदर्शन व सहकार्य केले जाते. त्यामुळे महिलांच्या पारंपरिक व्यवसायांना व्यावसायिक स्वरूप प्राप्त होत असून त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होत आहे. नवीन आर्थिक वर्षात नव्या बॅचचे काम सुरू झाले असून, प्रकल्पाच्या दुसऱ्या वर्षातील चौथ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडचे मुख्य मनुष्यबळ विकास व्यवस्थापक संतोष देशमुख आणि लोटे येथील मनुष्यबळ विकास व्यवस्थापक नंदन सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात ‘स्वयम् २.०’ मधील सर्वाधिक उलाढाल करणाऱ्या सायली कदम, अनुश्री पाटणे आणि अनुजा मोरे यांच्यासह पहिल्या वर्षातील ‘स्वयम्’ प्रकल्पातून उल्लेखनीय व्यवसाय करणाऱ्या अर्चना साळवी, ऋतुजा देवरुखकर, मानसी पाटणकर आणि किरण शर्मा यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांमध्ये महिला सक्षमीकरणाला विशेष महत्त्व आहे. दिशान्तर संस्थेच्या माध्यमातून कंपनीने यापूर्वी राबविलेले ‘आदिशक्ती’ आणि ‘अन्नपूर्णा’ हे प्रकल्प तसेच सध्याचा ‘स्वयम्’ उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील महत्त्वाचे टप्पे ठरत असल्याचे गौरवोद्गार संतोष देशमुख यांनी काढले. महिलांच्या कामातील आपुलकी, संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा त्यांच्या व्यवसायाला वेगळी उंची देत असून उद्योजिका म्हणून त्यांची सुरू असलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘स्वयम् २.०’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा पहिल्या वर्षाच्या यशाची पोचपावती आहे. ‘आदिशक्ती’, ‘अन्नपूर्णा’, ‘निर्भया’ आणि ‘स्वयम्’ अशा दिशान्तरच्या विविध पथदर्शी प्रकल्पांवर कन्साई नेरोलॅकने दाखविलेला विश्वास अत्यंत मोलाचा असल्याचे दिशान्तर संस्थेच्या सचिव सीमा यादव यांनी सांगितले.
पहिल्या वर्षी महिलांनी एकत्रितपणे सुमारे आठ लाख रुपयांचा व्यवसाय केला होता. यंदा हीच उलाढाल तब्बल ४६.९८ लाख रुपयांवर पोहोचली आहे. पुढील वर्षी ‘स्वयम् २.०’चा आढावा घेताना हा व्यवसाय एक कोटी रुपयांच्या पुढे गेलेला असेल, असा विश्वास प्रकल्प मार्गदर्शक अभिषेक कदम यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशान्तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश जोष्टे यांनी केले.

प्रदर्शनांच्या माध्यमातून ४६.९८ लाखांची उलाढाल
‘स्वयम्’ प्रकल्पातील शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांनी आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी राज्याच्या विविध भागांतील प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला. ग्लोबल कोकण महोत्सव (माणगाव), लायन्स महोत्सव (सावर्डे), उमेद अभियान (गोंदिया), त्रिवेणी एक्झिबिशन (गोरेगाव, मुंबई), सरस प्रदर्शन (वसई-विरार), आनंदोत्सव (देवरुख), स्वदेशी महोत्सव (मलबार हिल) आणि येलो रिबीन (पुणे) यांसारख्या विविध ठिकाणी स्टॉल उभारून महिलांनी आपल्या उत्पादनांची विक्री केली. या प्रदर्शनांच्या माध्यमातून एकूण ४६ लाख ९८ हजार १२१ रुपयांची विक्रमी उलाढाल साध्य करण्यात आली. महिला उद्योजकतेच्या वाढत्या सामर्थ्याचे हे यशस्वी उदाहरण ठरले आहे.