चिपळूण (प्रतिनिधी) : येथील मुंबई-गोवा महामार्गावरील शिवाजीनगर बस स्थानकातील स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अक्षरश: दुर्गंधी पसरली आहे. यामुळे बसस्थानकात येणारे प्रवासी याबाबत तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. या स्वच्छतागृहाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
या प्रसिद्धी पत्रकात मिलिंद कदम यांनी म्हटले आहे की, शिवाजीनगर बसस्थानक हे अत्यंत गजबजणारे असे बस स्थानक आहे. येथे अनेक मार्गावरील बसेस सुटतात. यामुळे प्रवाशांची मोठी वर्दळ येथे पहायला मिळते. मात्र येथील स्वच्छतागृहांमध्ये भीषण परिस्थिती दिसून येत आहे. शौचालयांचे दरवाजे तुटलेले असून त्यांना कडी देखील नाही. बऱ्याच वेळेला शौचालयांचा वापर करताना प्रवाशांवर दरवाजा सुतळीने बांधून घेण्याची वेळ येत आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे शौचालयांमध्ये बऱ्याच वेळेला पाणीदेखील उपलब्ध नसते, त्यामुळे प्रवाशांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. परिणामी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चिपळूणसारख्या सांस्कृतिक राजधानीत ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. चिपळूण आगाराच्या वतीने नुकतेच गणेशोत्सवात परतीच्या प्रवासाच्या बसेस याच बसस्थानकातून सोडण्यात आल्या. मोठ्या परिसरात हे बस स्थानक वसले आहे. त्यामुळे येथे सुविधाही दर्जेदार देणे अपेक्षित आहे. मात्र याकडे चिपळूण आगाराचे दुर्लक्ष होत असून प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांची होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी येथील स्वच्छतागृहांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी मिलिंद कदम यांनी केली आहे.













