आरोग्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून मंडणगड रुग्णालयाचा आढावा औषधे, रिक्त पदे आणि रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन

मंडणगड प्रतिनिधी : ग्रामिण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे भिंगळोली येथील ग्रामिण रुग्णालयातील प्रलंबित प्रश्नांना आता वरिष्ठ स्तरावरून गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) श्री. जंगम आणि श्री. कदम यांनी 1 नोव्हेंबर 2026 रोजी भिंगळोली येथील ग्रामिण रुग्णालयालास प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णालयाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान रुग्णालयाच्या इमारतीत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेण्यासोबतच परिसराची पाहणी करुन रुग्णालयात भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. मंडणगड तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिकांसाठी हे रुग्णालय महत्त्वाचे आरोग्यसेवा केंद्र आहे. मात्र, रुग्णालयात औषधांचा अपुरा पुरवठा, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तसेच रुग्णवाहिकांची कमतरता यामुळे रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. पाहणीदरम्यान रुग्णालयाच्या इमारतीत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेण्यासोबतच रुग्णालयात भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील सर्वच गावांमधील नागरिकांसाठी हे रुग्णालय महत्त्वाचे व एकमेव आरोग्यसेवा केंद्र आहे. यावेळी रुग्णालयाला आवश्यक असणारा औषधसाठा नियमित उपलब्ध करून देणे, रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे आणि रुग्णवाहिकांची उपलब्धता सुनिश्चित करणे इत्यादी महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. तसेच या सर्व समस्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही देण्यात आले. ना. योगेश कदम यांनी मतदारसंघातील आरोग्यविषयक प्रश्नांना प्राधान्य देत थेट आरोग्यमंत्र्यांच्या स्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे ग्रामिण रुग्णालयाच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळे रुग्णालयातील सुविधांमध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे मानले जात आहे. या पाहणीवेळी ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. बालाजी सगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, सभापती प्रणाली चिले, जि.प. सदस्य प्रताप घोसाळकर, उपसभापती दीपक मालुसरे पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, सौ. दिप्ती घडशी, शहरप्रमुख विनोद जाधव, विभाग प्रमुख इरफान बुरोंडकर सचिव सिध्देश देशपांडे आदींसह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.