शिरगाव-साळशी मार्गावरील धोकादायक लोखंडी बॅरल अखेर हटवली

‘प्रहार’च्या वृत्ताची बांधकाम विभागाकडून दखल

शिरगाव (प्रतिनिधी) :           देवगड तालुक्यातील शिरगाव-साळशी मार्गावरील माडखोल या (ठिकाणी )नजीकच्या वळणावर उभी करण्यात आलेली धोकादायक लोखंडी बॅरल अखेर हटवण्यात आली आहे. याबाबत दैनिक ‘प्रहार’ने २८ ऑक्टोबर रोजी सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत बांधकाम विभागाने शनिवारी तातडीने कार्यवाही करत बॅरल हटवली आणि खचलेल्या साईडपट्टीवर मातीचा भराव केला. त्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका तात्पुरता टळला असून वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे.

शिरगाव साळशी हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ९ असून देवगड, कणकवली आणि मालवण या तीन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर खासगी वाहनांसह एसटीची वाहतूकही मोठ्या प्रमाणावर सुरू असते. तीव्र उतार, धोकादायक वळणे आणि अनेक ठिकाणी खचलेल्या साईडपट्ट्या अशी या मार्गाची स्थिती आहे.

या मार्गांवरील माडखोल नजीकच्या वळणावर रस्त्याचा भाग खचल्याने वाहनचालकांना सावध करण्यासाठी रिकामी लोखंडी बॅरल उभी करण्यात आली होती. मात्र, तीव्र उतार व वळणामुळे ती वाहनचालकांच्या सहज नजरेस पडत नव्हती. त्यावर पांढरे पट्टे किंवा रात्री दिसण्यासाठी रेडियम नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता.या बाबत दैनिक ‘प्रहार’मधील वृत्ताची दखल घेत शनिवारी बांधकाम विभागाचे अधिकारी जेसिबीसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बॅरल हटवून खचलेल्या साईडपट्टीची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे .

तसेच या मार्गावरील अन्य खचलेल्या साईडपट्ट्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती, धोकादायक वळणांवर रस्त्याचे रुंदीकरण तसेच अरुंद मोऱ्यांचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.