सावंतवाडीत ‘आंगन का उत्सव’ उत्साहात

सुधाताई कामत शाळा क्र. २ मध्ये अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा गौरव

सावंतवाडी:सावंतवाडी शहरातील सुधाताई कामत शाळा क्र. २ मध्ये ‘आंगन का उत्सव’ उपक्रमाचे औचित्य साधून अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमादरम्यान अंगणवाडी सेविका अनुराधा पवार आणि मदतनीस अमिषा सासोलकर यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित चिमुकल्यांना पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन महिला व बालकल्याण सभापती तथा ‘आंगन का उत्सव’ कार्यक्रमाच्या संयोजिका दीपली भालेकर यांनी केले होते. भाजप शहराध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर आणि संयोजिका दीपली भालेकर यांच्या शुभहस्ते अंगणवाडी सेविका अनुराधा पवार व मदतनीस अमिषा सासोलकर यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजिका दीपली भालेकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी बोलताना सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर आणि भाजप शहर सरचिटणीस दिलीप भालेकर यांनी अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा गौरव करत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर आडीवरेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या सोहळ्याला भाजप शहराध्यक्ष व सभापती सुधीर आडीवरेकर, सभापती आनंद नेवगी, सभापती दीपली भालेकर, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, शहर सरचिटणीस दिलीप भालेकर, उपसभापती सुनीता पेडणेकर, नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले, मिसबा शेख, मेघना साळगावकर, मीना दाभोलकर, मेघना भोगटे, साक्षी गवस, तृप्ती विरनोडकर, ज्योती मुद्राळे, रूपाली रेमुळकर, शाळा क्र. २ चे मुख्याध्यापक अंजीवडेकर सर, अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, मदतनीस अमिषा सासोलकर यांच्यासह अनेक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.