रामचंद्र पवार यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

आदिवासी समाजातील उदयोन्मुख नेतृत्वाला भाजपकडून संधी; अजय दळवी, दत्ताजी महाडिक यांच्याकडून स्वागत

मंडणगड (प्रतिनिधी)  : मंडणगड तालुक्यातील पंदेरी येथील रामचंद्र हरिश्चंद्र पवार यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. आदिवासी समाजातील उदयोन्मुख नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून, त्यांच्या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील भाजप संघटनात्मक बळकटीला हातभार लागणार असल्याचे मानले जात आहे.
सन २०१७ मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रामचंद्र पवार यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीने घेतली आहे. व्यवसायानिमित्त ते सध्या मुंबईतील अंधेरी येथे वास्तव्यास असले, तरी मंडणगड तालुका तसेच मुंबई परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. विशेषतः आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर आणि समस्यांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
आदिवासी समाजाच्या विकासासाठी तसेच समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची आणि जनसंपर्काची दखल घेत भाजपमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजप पदवीधर मतदारसंघ सेलचे राज्य कार्यकारिणी सदस्य अजय दळवी, मंडणगड तालुकाध्यक्ष दत्ताजी महाडिक, तालुका उपाध्यक्ष विजय दुर्गवले, महेश महाडिक यांनी रामचंद्र पवार यांचे पक्षात स्वागत करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.