साटेली भेडशी येथील सद्गुरु राऊळ महाराज स्मारक मंदिरात १० वा वर्धापन दिन उत्साहात सुरु 

भाविकांची अलोट गर्दी 

दोडामार्ग : प्रतिनिधी

साटेली भेडशी येथील सद्गुरु राऊळ महाराज संस्थान, पिंगुळी संचलित श्री राऊळ महाराज स्मारक मंदिर येथे मंदिराचा १० वा वर्धापन दिन अत्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात सुरु आहे. या महोत्सवात परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात पहाटे काकड आरतीने झाली. यानंतर सकाळी ७ वाजता प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज चरणी अभिषेक, पाद्यपूजा व सार्वजनिक गाऱ्हाणे पार पडले. त्यानंतर श्री भवानी सातेरी धारेश्वर महिला भजन मंडळ, घोटगे यांचे सुश्राव्य भजन झाले.

 

वर्धापन दिनाचे औचित्य साधून सकाळी १० वाजता भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘निरोगी आरोग्यासाठी, एक पाऊल समाधानाकडे!’ या ब्रीदवाक्यांतर्गत झालेल्या या शिबिराला प्रा. डॉ. एस. एन. ओझा सर ट्रस्ट (पणजी, गोवा), अद्वैत चिकित्सालय (पिंगुळी), डॉ. प्रशांत सामंत व टीम ‘डिझायनर फार्मा’ तसेच मेनकाइँड फार्मा लि. यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिरात मॅग्नेटिक अॅनालायझर मशीनद्वारे कोणतीही सुई न टोचता शरीराची सर्वसमावेशक तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये शरीराच्या स्थितीबद्दल ४९ तपशीलवार रिपोर्ट्स मिळणार आहेत.

 

सकाळच्या सत्रात श्री सातेरी महिला मंडळ खानयाळे आणि सातेरी केळुबाई महिला मंडळ, दोडामार्ग यांचे सुश्राव्य भजन झाले. दुपारी १२.३० वाजता श्रींची महाआरती झाल्यानंतर दुपारी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यादरम्यान श्री दत्तभजनी संगीत भजनी मंडळ, बच्चे सावर्डे (कोल्हापूर) आणि श्री हनुमान दामोदर प्रासादिक भजन मंडळ (भेडशी) यांच्या भजनांचे कार्यक्रम झाले.

 

दुपारी ह.भ.प. भाऊ नाईक (वेतारे) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. सायंकाळी सांजआरती झाल्यानंतर पुन्हा महाप्रसाद होईल. रात्री ८ वाजता प. पू. राऊळ महाराजांच्या पादुकांची पालखी मिरवणूक सोहळा व रात्री १० वाजता श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूळ यांच्या “देवी भद्रकाली” हार्दिक दशावतारी नाट्यप्रयोग होईल. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी प. पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट (पिंगुळी), सद्गुरु राऊळ महाराज संस्थान (पिंगुळी), समस्त विश्वस्त मंडळ आणि स्थानिक व्यवस्थापन समिती, साटेली-भेडशी यांनी विशेष परिश्रम घेतले.