कुत्र्याला मारल्याच्या कारणावरून वाद; शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार
मंडणगड (प्रतिनिधी): तालुक्यातील सडे जाधववाडी येथे कुत्र्याला मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ६४ वर्षीय वृद्धाला तिघांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना २ नोव्हेंबर २०२६ रोजी घडली. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटने बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्ताराम परशुराम जाधव (वय ६४, रा. सडे जाधववाडी, ता. मंडणगड) हे सडे गावातील बंद असलेल्या अंगणवाडीच्या आवारात त्यांच्या भावाची राखण करीत असताना आरोपी अल्पेश सोपान जाधव याने तेथे येऊन, ‘तू माझ्या कुत्र्याला का मारलेस?’ असा जाब विचारत फिर्यादी यांच्याशी वाद घातला. दरम्यान, वाडीतील समाधान तुकाराम जाधव आणि सोपान सिताराम जाधव हे दोघेही तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर अल्पेश सोपान जाधव याने हातातील काठीने फिर्यादी यांच्या डोक्यावर व कपाळावर वार करून त्यांना दुखापत केली. तसेच समाधान तुकाराम जाधव व सोपान सिताराम जाधव यांनी हाताच्या ठोशांनी मारहाण करीत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२ व ३(५) नुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.












