मुंडे महाविद्यालयात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा

मंडणगड(प्रतिनिधी) : लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, क्रीडा विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून तर स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते. यावेळी डॉ. अशोक साळुंखे, डॉ. भरतकुमार सोलापूरे, प्रा. हनुमंत सुतार, डॉ. संगीता घाडगे, डॉ.मुकेश कदम, डॉ. महेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.तत्पूर्वी डॉ.संगीता घाडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर डॉ. महेश कुलकर्णी यांनी उपस्थित सर्वांना ‘राष्ट्रीय एकता व सुरक्षितते’ बाबत शपथ दिली.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर म्हणाले, की, भारतीय राष्ट्रीय आंदोलनाला वैचारिक व विधायक दिशा देण्याचे महत्वपूर्ण कार्य सरदार वल्लभभाई पटेल त्यांनी केले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यांनी काही वर्षे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री या नात्याने देशाचा कारभार सांभाळला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील संस्थांनाचे विलीनीकरण करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. भारतातील संस्थानांचे विलीनीकरण करण्याचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल देशातील जनता सरदार वल्लभभाई पटेल यांना ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखते. म्हणून आजही त्यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत असे आहे. तसेच स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेवून या विद्यार्थ्यांनी दोन्ही नेत्यांच्या कार्याचा आदर्श आपल्या डोळयासमोर ठेवावा असे सांगितले.
कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. हनुमंत सुतार यांनी मानले.