पाचरळ फाटा येथील तीव्र वळणावर खड्ड्यांचे साम्राज्य; अपघातांचा धोका वाढला!

वाहनचालकांची जीव मुठीत धरून प्रवासाची वेळ; प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार?

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील पाचरळ फाटा येथील तीव्र वळणावर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः तीव्र वळणावरच खड्डे पडल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांसह अन्य वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.राष्ट्रीय महामार्गावरील पाचरळ फाटा येथील हे वळण आधीच धोकादायक मानले जाते. त्यातच रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. वळणावरून जाताना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे कठीण होत असून, खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावा लागत आहे. त्यामुळे समोरासमोर वाहनांची धडक होण्याची तसेच दुचाकीस्वार घसरून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. या मार्गावरून दररोज स्थानिक नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे रस्त्याची ही अवस्था केवळ वाहनचालकांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीही चिंतेचा विषय बनली आहे.
एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित रस्त्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने या ठिकाणची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत, तसेच तीव्र वळणावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
प्रशासनाने संभाव्य अपघाताची वाट न पाहता पाचरळ फाटा येथील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा वाहनचालक व नागरिक व्यक्त करीत आहेत.