खेड (प्रतिनिधी) – कोकणातील लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी भारतीय जनता पार्टी यांच्या पुढाकारातून खेड येथे शिमगा उत्सव – गोमुचा नाच २०२६ या पारंपरिक उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी, खेड आणि राजवैभव प्रतिष्ठान, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक, खेड, जिल्हा रत्नागिरी येथे होणार आहे.
शिमगा हा कोकणातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि लोकजीवनाशी नाळ जोडणारा उत्सव असून, त्यातील गोमुचा नाच ही पारंपरिक लोककला आजही ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात सादर केली जाते. मात्र बदलत्या काळात या कलेला योग्य व्यासपीठ मिळावे, कलाकारांचा सन्मान व्हावा आणि नव्या पिढीपर्यंत ही परंपरा पोहोचावी, या उद्देशाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे नेते श्री. वैभव सदानंद खेडेकर यांच्या संकल्पनेतून खेड शहरात यापूर्वी दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव यांसारख्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उत्सवांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील पारंपरिक सण-उत्सवांना नेहमीच हक्काचे आणि सन्मानाचे व्यासपीठ मिळावे, ही भूमिका भाजपाची असून, त्याच भूमिकेतून शिमगा उत्सव – गोमुचा नाच या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येत आहे.
या उत्सवाच्या निमित्ताने सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोमुचा नाच मंडळाचा यथोचित सन्मान करण्यात येणार असून, लोककलेला प्रोत्साहन देण्याचा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. कोकणातील सांस्कृतिक ओळख अधिक बळकट करण्यासाठी सर्व गोमुचा नाच मंडळांनी, कलाकारांनी आणि शिमगा प्रेमींनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. वैभव सदानंद खेडेकर यांनी केले आहे.











