इन्सुली एक्साइज संशयाच्या भोवर्यात
बांदा : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली विभागात कुडाळ पथकाने सातोळी बावळाट येथे बेकायदा दारु वाहतुकी विरोधात कारवाई करुन इन्सुली विभागाची निष्क्रियता दाखवून दिली आहे. बांदा – दाणोली मार्गावर केलेल्या कारवाईत ३ लाख ६१ हजार ७६० रुपयांच्या दारुसह एकूण १३ लाख २१ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मयुर रविंद्र माने, विनोद विठ्ठल माने व सुशांत अशोक गायकवाडी (तिघेही रा. तासगाव, सांगली) यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. इन्सुली एक्साइज विभाग संशयाच्या भोवर्यात सापडला आहे.
इन्सुली एक्साइजचे अधिकारी कायम कार्यालयातच बसून असतात अशी सर्वसामान्यांची तक्रार असते. साहजिकच बेकायदा दारु वाहतुकीला सपोर्ट करण्याचीच त्यांची भूमिका असते. बांदा – दाणोली मार्ग तर बेकायदा दारु वाहतुकीसाठी सुरक्षित मानण्यात येतो. पोलीसांसह एक्साइजचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात हे चित्र सातत्याने दिसून येते.
बांदा – दाणोलीमार्गे सांगलीत बेकायदा गोवा बनावटी दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती एक्साइजच्या कुडाळ पथकाला मिळाली होती. त्यानुसार सातोळी बावळाट येथे सापळा रचला होता. गोव्यातून येणारी कार (एमएच ११ एडब्ल्यू ८४६९) तपासली असता त्यात गोवा बनावटीच्या दारुचे बॉक्स आढळून आले. सदर कारला पायलटींग करणारी मोटरसायकल (एमएच १० डीएफ २६४९) जप्त करण्यात आली. मुद्देमालाची एकूण किंमत १३ लाख २१ हजार ७६० रुपये आहे.
सदर कारवाई कुडाळ निरीक्षक ए. ए. पाडाळकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर. डी. ठाकूर, जवान एस. एम. कदम, मदतनीस विजय राऊळ व प्रशांत परब यांनी केली. पुढील तपास निरीक्षक ए. ए. पाडाळकर करीत आहे.
————










