
कणकवली शहरातील गणपती साना येथे एका तरूणाचा मृतदेह नदी कीनारी सापडला. जेव्हा हा तरूणाचा मृतदेह सापडला तेव्हाच हा संशयास्पद मृत्यू असल्याची शक्यता व्यक्त होत होती. सर्वसाधारणपणे एखाद्याचा अज्ञातस्थळी मृत्यु होतो. तेव्हा कोणीतरी नातेवाईक पुढे येतात. परंतु २२ ऑगस्ट २०२३ रोजी गणपती साना येथे तरूणाचा मृतदेह सापडल्यानंतर गेल्या पाच दिवसात कोणीही नातेवाईक काहीही सांगण्यासाठी पुढे आलेले नाहीत. याच दरम्यान आत्महत्या की खुन हा संशय व्यक्त होत असतो. बऱ्याचवेळा खुन असला तरीही पोलिस आत्महत्या दाखवुन मोकळे होतात. आत्महत्या दाखवली की फाईल तत्काळ बंद तपासकामाची झंजटबाजीच नाही. खरंतर आत्महत्या असली तरीही आत्महत्ये मागच कारण पोलिसांनी शोधावं अशी अपेक्षा असते. परंतु एवढी तसदी पोलिस घेत नाहीत. हा आजवरचा सार्वत्रिक अनुभव आहे. एखाद्या खुनाचा तपास लागतो त्या खुन प्रकरणातील आरोपी एकतर स्वत: होऊन पोलिसांसमोर हजर झालेला असतो. प्रत्यक्षदर्शी किंवा अप्रत्यक्ष चर्चेतून उघडकीस आलेले खुनाचे प्रकार असतात. पोलिसांच्या मेहनतीने, कर्तव्यदक्षतेने तपासकामात निष्पन्न झालेले गुन्हे फारच कमी आहेत. एकतर पोलिसांची पोलिस ठाण्यात असलेली संख्या आवश्यकतेपेक्षा कमी आहे. हे खरं आहे. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांना कोणतीच कारण पुढे करून चालत नाहीत. कणकवली शहरातील पाच दिवसांपूर्वी गणपती साना येथे एका तरूणाची मर्डर झाली आहे. ही मर्डरच आहे. असं म्हणण्याच धाडस त्या तरूणाच्या मृतदेहाच पोस्टमार्टेम केल्यानंतर जो वैद्यकिय अहवाल प्राप्त झाला आहे. आता पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली पोलिस आता त्या दिशेने तपास करीत आहेत. तो तरूण परप्रांतिय असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. २२ ऑगस्टला गणपती साना येथे युवकाचा मृतदेह आढळून आल्यानंतर कणकवली पोलिसांनी कोणत्या शक्यता पडताळून पाहिल्या. सीसीटीव्ही बंद असल्याने फुटेज उपलब्ध नाही. त्यामुळे पोलिस तपासात दिशा देणारा कोणताही ‘क्लू’ पोलिसांच्या हाती लागलेला नाही. गणपती साना येथील या तरूणाच्या हत्येचा शोध घेणे फार सोपही नाही आणि पोलिसांनी ठरवल तर अवघडही नाही. खुनाचा तपास करण्याची फक्त पोलिसांची मानसिकता असायला हवी आहे. तरच ते शक्य आहे. कणकवली पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक अमित यादव नव्यानेच कणकवली पोलिस स्टेशनला दाखल झाले आहेत. यामुळे या खुन प्रकरणाची उकल करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पोलिस निरीक्षक अमित यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आहे. कणकवली पोलिस स्टेशनपासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या गणपती साना या नदीकिनारी भरवस्तीत खुन झाला आहे. जरी वस्ती काही अंतरावर असली तरीही सतत लोक येत-जात असतात. पोलिसांनी तपास करताना सर्व शक्यता पडताळून पहाण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर पोलिस तपासात यश मिळत नाही म्हणून हे प्रकरण फाईलबंद होता कामा नये. खरंतर गणपती साना येथील आजच्या घडीला बेवारस असणाऱ्या युवकाची झालेली मर्डर केस ‘डिक्टेट’ होणं ही कणकवली पोलिसांची कसोटी आहे. एखादा खुन होतो आणि त्या खुनाचे पुराव्यासह आरोपी सहज सापडतात. ज्यामध्ये पोलिसांचे कोणतेही कष्ट नसतात. कर्तव्यदक्षता नसते. असं आताच्या क्षणाला या मर्डर केसमध्ये पोलिसांकडे कोणताही पुरावा नाही, साक्षीदार नाही, प्रत्यक्षदर्शी सांगणारा कोणीही नाही. किंवा कुणावर संशय वाटावा अशी स्थिती नाही. मात्र, तरीही गळा आवळून केलेला तो खुन आहे. म्हणूनच कणकवली पोलिसांसमोर हे फारमोठं ‘चॅलेंज’ आहे. आजकाल पोलिस खुन प्रकरण फार कमी शोधतात. आणि उघड करतात. कारण महिनाभर प्रकरण तापलेल असत. वृत्तपत्र आणि माध्यम विषय लावून धरतात. नंतर लोकही विसरतात आणि माध्यमही यामुळे पोलिसही तपासकामात फार तसदी घेत नाहीत. प्रकरण फाईल बंद डिवायएसपी तपासणी दाखवुन आपोआप फाईल बंद होते. एस.पी., आय.जींच्या तपासणीत एखादवेळ फाईल ओपन झाली की पुन्हा फाईल बंद ती कायमची ही खाकीवर्दीतली ‘सिस्टीम’ आहे. ही सर्वांनाच माहिती आहे. आता पहायचे कणकवली पोलिस पुढे तपास कसा करतात आणि या खुन प्रकरणातील आरोपीपर्यंत कसे पोहचतात.












