‘फ्लाय ९१’कडून सिंधुदुर्ग ते नवी मुंबई विमानसेवा तिकीट बुकिंग सुरू; पर्यटन, व्यापार आणि रोजगारनिर्मितीला मिळणार चालना
पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश; पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी मानले आभार
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्गच्या पर्यटन, व्यापार आणि आर्थिक विकासाला नवी दिशा देणारी सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई विमानसेवा १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. या मार्गावरील विमान तिकिटांचे बुकिंग ‘फ्लाय ९१’ कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळासह प्रमुख ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवर सुरू झाल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली. ही विमानसेवा सुरू होण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरल्याचे सांगत मोंडकर यांनी आभार मानले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सिंधुदुर्गची हवाई जोडणी झाल्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना कोकणात येणे अधिक सुलभ होणार आहे. प्रवासाचा वेळ वाचणार असल्याने सिंधुदुर्गातील समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, जलक्रीडा, स्कूबा डायव्हिंग आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल. परिणामी हॉटेल, होमस्टे, रिसॉर्ट, वाहतूक, पर्यटन सेवा तसेच काजू-आंबा व्यवसायालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
मुंबई आणि नवी मुंबईसारख्या आर्थिक केंद्रांशी थेट संपर्क उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात नवीन गुंतवणूक, उद्योग आणि रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण होतील. विशेषतः स्थानिक तरुणांना स्वगावीच पर्यटन व व्यापार क्षेत्रात उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. पालकमंत्री नितेश राणे यांच्या ‘रिव्हर्स मायग्रेशन’ अर्थात उलट स्थलांतराच्या संकल्पनेला ही विमानसेवा बळ देणारी ठरेल, असा विश्वास मोंडकर यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी ही विमानसेवा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, कोकणच्या पर्यटनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळेल, असे सांगत विष्णू मोंडकर यांनी पालकमंत्री नितेश राणे आणि ‘फ्लाय ९१’च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.













