मळेवाड ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
न्हावेली । प्रतिनिधी : दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठी कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. ही गरज ओळखून मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांसाठी गावातच ‘उत्पन्न दाखला शिबिराचे’ आयोजन केले होते. या उपक्रमाचा शुभारंभ सरपंच सौ. मिलन पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रवेश प्रक्रियेसाठी एक वर्ष व तीन वर्षांच्या उत्पन्न दाखल्याची मोठी गरज असते. हा दाखला मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना सावंतवाडी तहसीलदार कार्यालय किंवा खासगी केंद्रांवर जावे लागते. यामुळे होणारा वेळेचा अपव्यय आणि आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. “विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले मिळावे आणि त्यांची पायपीट थांबावी यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे,” असे उपसरपंच हेमंत मराठे यांनी यावेळी सांगितले.
हे शिबिर सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामध्ये सेतू केंद्रातील कर्मचारी संजय आणि मळेवाड तलाठी अनुजा भास्कर यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे गावातील अनेक विद्यार्थ्यांची सोय झाली असून ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे पालकांमधून स्वागत होत आहे.













