वैभववाडीत दिवाळी फराळ महोत्सव : उमेदचे आयोजन

सभापती सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन

वैभववाडी प्रतिनिधी
उमेद अभियान अंतर्गत वैभववाडी येथे तालुकास्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या फराळ महोत्सवाला भेट देऊन फराळ खरेदीतून महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन उमेद अभियान कक्षाकडून करण्यात आले आहे.

तालुक्यातील बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहकार्य व्हावे, बचत गटाकडून उत्पादीत खाद्य पदार्थाला विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी. यासाठी तालुका अभियान कक्ष सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उमेद कक्षाच्यावतीने तालुक्यातील बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. तालुका अभियान कक्षाकडून येथील बस स्थानकासमोर फराळ विक्रीचा स्टॉल लावण्यात आला आहे.

या फराळ महोत्सवाचे उद्घाटन सभापती सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, पं.स. सदस्य मंगेश लोके, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, सहाय्यक गट विकास अधिकारी, तसेच पंचायत समिती वैभववाडी सर्व अधिकारी व कर्मचारी, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष ,वैभववाडी कर्मचारी उपस्थित होते.