सावंतवाडी बॅरिस्टर नाथ पै सभागृहात उद्या ‘महाराजस्व समाधान शिबिर’

एकाच छताखाली मिळणार विविध शासकीय सेवा अन् दाखले

​सावंतवाडी (प्रतिनिधी): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने राज्यभर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबवले जात आहे. नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, महसूल विभागाशी संबंधित सेवा, विविध प्रमाणपत्रे, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत मिळणाऱ्या सुविधा आणि मोफत आरोग्य तपासणी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

​या अभियानांतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी उद्या, शुक्रवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात या भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

​या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तसेच खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, अध्यक्षस्थान सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर भूषवतील.

​या शिबिरास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, विधानपरिषद आमदार प्रमोद जठार, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिकेत तटकरे, ॲड. निरंजन डावखरे, प्रसाद लाड, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी हजेरी लावणार आहेत.

​या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे स्टॉल्स उभारले जाणार असून दाखले, प्रमाणपत्रे, अर्ज स्वीकारणे, थेट मार्गदर्शन व शासकीय योजनांचे वितरण पारदर्शक पद्धतीने केले जाईल. शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी व युवकांनी या संधीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी यांनी केले आहे.