नको प्रकल्प की विकास …हवं फक्त राजकारण…!

नको प्रकल्प की विकास …हवं फक्त राजकारण…!

वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर.

कोकणातील जनतेचा बुद्धीभेद करत खोट्या अफवा पसरवत केवळ राजकीय मंडळी स्वार्थासाठी, राजकीय पोळी भाजण्यासाठी प्रकल्पांच्या विकासाच्या विरोधात उभे रहायच हा काही राजकीय नेते, पुढाऱ्यांचा खास व्यवसायच आहे. काही राजकीय पुढारी विरोधासाठी उभे रहातात त्यामागे अर्थकारणही दडलेल असते. एखाद्या प्रकल्पाला जोरदार विरोध करायचा आणि मग ‘मांडवली’ करायची अळीमिळी गूपचिळी हा प्रकारही काही ठिकाणी झालेला दिसतो…

पूर्वी कोकण ही शापित भूमी अस म्हटले जायचं. त्यातलं खरं खोट किती यावर कदाचित एकमत असलं-नसलं तरीही कोकणात काहीही चांगल काही घडणार असेल उभं रहाणार असेल तर विरोधासाठी आपोआप एक फळी तयारच असते. यामुळे कोणताही प्रकल्प कोकणात उभा राहू शकला नाही. पूर्वी पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील राजकीय नेते, कोकणातील राजकीय नेत्यांना खेकड्याची उपमा द्यायचे आजही पाय खेचण्यासाठी, कोणत्याही प्रकल्पाला आडवे जाण्यासाठी काहींचा पुढाकार हा ठरलेलाच असतो. कोकणातले एक उदाहरण तरी कोणी सांगू शकेल का? की कोणी चांगल्या हेतूने एखाद्या प्रकल्पाच्या बाजूने उभं रहाण्यासाठी आजवर कधीतरी चार माणसं एकत्र येत हे चांगल आहे म्हणून सांगायला पुढे आलेली… अशी झालेली घटना कधी कोणाला आठवतही नसेल. मुळात एक गोष्ट अशी आहे की कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकल्पाला होणारा विरोध हा राजकीय स्वरूपाचा असतो. त्या विरोधाला फक्त आणि फक्त राजकारणाचीच किनार असते. हेच सिद्ध झाले आहे. स्वत:च राजकीय अस्तित्व टिकवून ठेवणे किंवा नसलेलं राजकीय अस्तित्वच निर्माण करण्यासाठीची चाललेली सर्वांची धडपड असते.
कोकणच्या विकासासाठी धडपडणारे, विकासाचे व्हीजन असणारे राजकीय नेते एका बाजूला आणि कोकणातील जनतेचा बुद्धीभेद करत खोट्या अफवा पसरवत केवळ राजकीय मंडळी स्वार्थासाठी, राजकीय पोळी भाजण्यासाठी प्रकल्पांच्या विकासाच्या विरोधात उभे रहायच हा काही राजकीय नेते, पुढाऱ्यांचा खास व्यवसायच आहे. काही राजकीय पुढारी विरोधासाठी उभे रहातात त्यामागे अर्थकारणही दडलेल असते. एखाद्या प्रकल्पाला जोरदार विरोध करायचा आणि मग ‘मांडवली’ करायची अळीमिळी गूपचिळी हा प्रकारही काही ठिकाणी झालेला दिसतो.
कोकणातील सर्वसामान्य जनतेला आजवर इतक्या वर्षानंतरही कळलेलं नाही की आपलं हित कशात आहे तेच मुळी जनतेला समजून आलेलं नाही. रिफायनरीला विरोध, अणुउर्जा प्रकल्प नको, सी वर्ल्ड प्रकल्प नको, स्टरलाइट प्रकल्प नको, पर्यटन व्यवसायाला चालना देणारे -येणारे प्रदूषणविरहित प्रकल्प आले तरी त्याला विरोध होतो. तेव्हा मात्र आश्चर्य वाटत! प्रकल्पांना प्रदूषणकारी घोषित करणारे, किंवा अफवा पसरवणाऱ्यांना त्या प्रकल्पासंबंधी कधी काहीच माहिती नसत. केवळ प्रकल्पाला विरोध करायचा याच हेतूने विरोधाच रान पेटवल जाते. एखाद्या चांगल्या कामाची उभारणी करण्यासाठी फार कष्ट असतात. परिश्रमपूर्वक एखाद्या चांगल्या कामाची उभारणी होत असते. कोणतही चांगले काम हे सहजरित्या कधीच होत नाही. अगदी गावातली एखादी शाळा उभारणी करताना अनेक मदत करणारे हात पुढे येतात तेव्हा कुठे एखाद्या गावात शिक्षणाची सुविधा उभी रहाते. त्यामुळे एखादा प्रकल्प उभा रहाण्यासाठी जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा विरोध करणारे पुढे येतात. एखाद्या गावात प्रकल्पाची चर्चा होत असताना त्या गावातील असंख्य लोकांना आपण विरोध का? कशासाठी करतोय याची कोणतीही कल्पना नसते. परंतु कोण तरी एखादा विरोधी पक्षाचा पुढारी येऊन विरोध करायचे सूचवतो तेव्हा मग त्यात विरोधाच्या सूरात सूर मिसळण्यासाठी दहाजण पुढे येतात. आणि मग नाहक विरोधाचे वातावरण तयार होते. बाकीच राहू द्या. कोकणात येऊ घातलेला सी वर्ल्ड प्रकल्प कोकणात उभा न रहाणे, पंचतारांकित हॉटेल प्रकल्प हे सर्व वर्षानुवर्षे रखडले याच प्रमुख कारण राजकीय स्वार्थासाठी जनतेचा बुद्धीभेद करत राजकारण करणारे राजकीय पुढारी हेच प्रमुख होते अन आहे. प्रत्येक विकासकामांमध्ये केवळ विरोध करायचा इतकच काम आहे. एक गंमत अशी प्रकल्पांना आणि विकासाला विरोध करणाऱ्यांपैकी कोणी कधी एखादा विकास प्रकल्प किंवा विकासाचे काम केल्याचे उदाहरणही कोणीही देवू शकणार नाही. याचे कारण जे विरोध करणारे आहेत त्यांच्याकडे नकारात्मकता ठासून भरली आहे. त्यांच्याकडे कोणतीही विकासाची दृष्टी नाही. विमानतळ प्रकल्पाला विरोध झाला. नुकसान कोकणचे झाले. चिपी-सिंधुदुर्ग विमानतळ हा आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार होता. प्रस्ताव तसाच होता. परंतु या विमानतळालाच विरोध झाला.परिणामी तेव्हा अस्तित्वात आणि चर्चेत नसलेला मोपा-गोवा विमानतळाची उभारणी झाली हे केवळ विरोध करत काळेझेंडे घेऊन जे धावत होते. त्यांच्यामुळेच झाले आहे. कधीतरी कोकणातील जनतेने विरोधासाठी विरोध करत राहिल्याने कोकणाचे…पर्यायाने आपलेच नुकसान होत आहे; याचा विचार कधीतरी केला तरच कोकणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.आणि आज बंद असलेली गावखेड्यातली घर उघडी रहातील. माणसांनी गाव गजबजलेली राहतील. गाव ओस पडत आहेत याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जबाबदार जे प्रत्येक विकासप्रक्रियेला विरोध करणारे आहेत तेच आहेत.