न्यायापासून कोणीही वंचित राहू नये; तालुका विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार
खेड प्रतिनिधी : खेड तालुका विधी सेवा प्राधिकरण, खेड यांच्यातर्फे राष्ट्रीय विधी सेवा दिनाच्या अनुषंगाने आंबये येथील मातोश्री वृद्धाश्रमात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना कायदेविषयक माहिती आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांसोबत मनमोकळा संवाद साधत त्यांना दिवाळी फराळ देऊन दीपदान करण्यात आले.
या उपक्रमाला जिल्हा न्यायाधीश वैशाली निरगुडे पाटील, वरिष्ठ न्यायाधीश गणेश पाटील, दिवाणी न्यायाधीश दादासाहेब म्हस्के तसेच खेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते उत्तमकुमार जैन उपस्थित होते. न्यायाधीशांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अनुभव जाणून घेतले. दिवाळी फराळ आणि दीपदानाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी वरिष्ठ न्यायाधीश गणेश पाटील यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्याची माहिती दिली. आर्थिक परिस्थितीमुळे कोणालाही न्यायापासून वंचित राहावे लागू नये, प्रत्येक गरजू व्यक्तीला न्यायालयात जाण्याची संधी मिळावी, हा विधी सेवा प्राधिकरणाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वयोवृद्ध नागरिक, महिला, मुले आणि गरजू व्यक्तींना न्यायालयीन प्रक्रियेत मोफत विधी सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. कायदेशीर अडचणींमध्ये असलेल्या व्यक्तींना शासनाच्या माध्यमातून आवश्यक मदत पुरविण्यात येते. यासाठी प्रत्येक न्यायालयात तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय असून, लीगल एड क्लिनिकच्या माध्यमातून नागरिकांना विविध कायदेविषयक सेवा आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
राष्ट्रीय विधी सेवा दिन ९ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. मात्र, यंदा दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे ६ नोव्हेंबर रोजी आंबये येथील मातोश्री वृद्धाश्रमात हा उपक्रम राबविण्यात आला. विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्याची माहिती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावी आणि गरजू व्यक्तींना कायदेशीर मदतीचा लाभ मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
गरजू नागरिकांना कायदेविषयक मदत मिळवून देण्यासाठी तालुका विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर असून, नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.











