पळसंब येथे आचरा पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी दिवाळी भेट!

▪️संवादातून सुरक्षिततेचा विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न

मसुरे | झुंजार पेडणेकर 

दिवाळीच्या सणानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासोबतच त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने आचरा पोलीस ठाण्याच्या वतीने पळसंब येथे विशेष दिवाळी भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पळसंब येथील श्री जयंती देवी मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांना विविध प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याबाबत तसेच कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक सौ देसाई यांनी मार्गदर्शन केले.

केवळ कायदा व सुव्यवस्था राखणे एवढ्यापुरतीच पोलिसांची भूमिका मर्यादित नसून समाजातील ज्येष्ठ नागरिकांना आधार देणे, त्यांच्याशी नियमित संपर्क ठेवणे आणि त्यांच्या मनात पोलिसांविषयी विश्वास निर्माण करणेही महत्त्वाचे आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

दिवाळीच्या निमित्ताने पोलिसांनी दिलेली ही भेट ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंददायी ठरण्यासोबतच पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणारी ठरली असल्याचे मनोगत सरपंच चंद्रकांत गोलतकर यानी व्यक्त केले. यावेळी पळसंब सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर, पोलीस उपनिरीक्षक सौ. देसाई,

पोलीस पाटील अनुष्का परब, पुनम गोलतकर, प्रमोद सावंत, रतिका गोलतकर आदी सह जेष्ठ नागरिक उपस्थित होते.