दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

दिवाळीच्या सुट्टीत बालहातांना सर्जनशीलतेचे पंख; पर्यावरणपूरक आकाशकंदिलांची निर्मिती

संगमेश्वर(बुरंबी-शिवने) : येथील बुरबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  दिवाळी सणाचे औचित्य साधून दिवाळी सुट्टीत पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
मोबाईल आणि डिजिटल मनोरंजनाच्या जगात रमण्याऐवजी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला वाव देत स्वतःच्या हातांनी आकर्षक आकाशकंदील बनविण्यास सुरुवात केली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलात्मकता, स्वावलंबन आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यालयाच्या वतीने दिवाळी सुट्टीतील उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मितीचे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रंगीत कागद, पुठ्ठा, बांबूच्या काड्या, जुने वर्तमानपत्र, टाकाऊ वस्तू तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा उपयोग करून विद्यार्थी विविध आकारांचे आणि आकर्षक रचनेचे आकाशकंदील बनविले आहेत,. पारंपरिक आकाश कंदिलांसोबतच आधुनिक कलाकुसर आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांचा सुंदर मिलाफ त्यांच्या निर्मितीत पाहायला मिळत आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना प्राचार्य प्रकाश विरकर यांनी सांगितले की- या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ हस्तकलेचा आनंद मिळत नसून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ आणि सुंदर वस्तू तयार करण्याची प्रेरणाही मिळत आहे. स्वतःच्या कल्पनेतून एखादी कलाकृती साकारताना विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, निरीक्षणशक्ती, कल्पकता आणि कलागुण विकसित होण्यास मदत होत आहे
विशेष म्हणजे, पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकाशकंदील तयार करण्यावर भर दिल्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेशही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. दिवाळीचा आनंद साजरा करताना पर्यावरणाची काळजी घेण्याचा संस्कार या उपक्रमातून रुजविला जात आहे.

विद्यार्थ्यांच्या छोट्या हातांनी साकारलेले हे आकाशकंदील केवळ घरांची शोभा वाढविणार नाहीत, तर त्यांच्या कल्पकतेचा, मेहनतीचा आणि सर्जनशीलतेचा प्रकाशही सर्वत्र पसरवतील. दिवाळीच्या सुट्ट्यांचा उपयोग आनंदासोबतच ज्ञान, कौशल्य आणि संस्कारांच्या जोपासनेसाठी करणारा विद्यालयाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. या उपक्रमाबाबत संस्था अध्यक्ष दिलीपराव मोरे, सरचिटणीस शरद बाईत,शाळा
व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतापसर देसाई, शाळा समिती अध्यक्ष दिनेश जाधव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत