आंबव येथे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या तुळसणीतील तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

मोहिते कुटुंबावर कोसळला दु:खचा डोंगर

देवरूख (प्रतिनिधी):

देवरूख-रत्नागिरी मार्गावरील आंबव परिसरात गेल्या महिन्यात झालेल्या भीषण मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झालेल्या तुळसणी गावातील केतन संजय मोहिते या तरूणाची मृत्यूशी सुरू असलेली संघर्षमय झुंज काल सोमवारी अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्याचे अखेर निधन झाले आहे.

गेल्या महिन्यात आंबव नजीक घडलेल्या अपघातात केतन मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून तो मृत्यूशी निकराची झुंज देत होता. कुटुंबीय आप्तस्वकीय आणि मित्रपरिवार त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सातत्याने प्रार्थना करत होते. परंतु उपचारांना अपेक्षेप्रमाणे यश येऊ शकले नाही आणि अखेर काल सोमवारी त्याची प्राणज्योत मालवली. हसऱ्या आणि मनमिळाऊ स्वभावाच्या केतन याच्या अकाली निधनाने मोहिते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.