मंडणगड प्रतिनिधी : नळपाणी योजनेचे श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात विरोधकांना सभ्यता आणि राजकीय संस्कृतीचा विसर पडला आहे. विरोधकांनी मर्यादेत राहून आणि पातळी न सोडता वक्तव्ये करावीत. मंडणगड शहराची नळपाणी योजना कोणी आणि कशी मंजूर करून घेतली, याबाबत कागदोपत्री पुराव्यांसह पंचांसमक्ष खुली चर्चा करण्याचे आव्हान नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांनी विरोधकांना दिले. नळपाणी योजनेच्या श्रेयवादावरून राजकारण करणाऱ्या विरोधी गटाचा त्यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
मंडणगड नगरपंचायत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते. यावेळी बोलताना कोकाटे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी प्रशासकीय पातळीवर सहकार्याची भूमिका ठेवल्यामुळे नगरपंचायतीच्या माध्यमातून सुमारे २० कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. यातील किती कामे जनसुविधांसाठी आहेत आणि किती वैयक्तिक लाभाची आहेत, हे सार्वजनिक करण्यास आम्हाला कोणीही भाग पाडू नये. सत्ताधारी म्हणून आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये. जनता सुज्ञ आहे. महायुती म्हणून आम्ही सर्व पक्षांचा सन्मान करतो. या विकासकामांसाठी सहकार्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे तसेच राज्याचे आरोग्य व ग्रामविकास मंत्र्यांचे योगदान आम्ही कधीही नाकारलेले नाही. नळपाणी योजनेच्या मंजुरीसाठी सहकार्य केल्याबद्दल येथील जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. मात्र, ही योजना कोणी आणि कशी मंजूर केली, याबाबत विरोधकांनी पाच पंचांसमक्ष कागदोपत्री पुराव्यांसह खुली चर्चा करावी, असे आव्हान त्यांनी दिले.
लाख आणि कोटी रुपये यातील फरक न समजणारे तसेच निवडून कधी आलो, हेही योग्य प्रकारे सांगता न येणारे लोक प्रशासकीय कामकाजाच्या ज्ञानाअभावी विकासकामांचा पाठपुरावा काय करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विकासकामांमधील कमिशनचा लाभ काही ठरावीक व्यक्तींनाच झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
नळपाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी केलेला पाठपुरावा, त्यामध्ये आलेले अडथळे आणि त्यावर मात करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देताना त्यांनी योजनेसाठी सहकार्य करणाऱ्या पाच जमीन देणगीदारांचे विशेष आभार मानले. प्रशासकीय कामकाज सुरू असताना स्थानिक पातळीवरील सत्ताधारी म्हणून वेळोवेळी आलेल्या अडचणींचा सामना करावा लागला. राज्य शासनाकडून गेल्या साडेचार वर्षांत मंडणगडच्या वाट्याला आलेल्या मर्यादित निधीचा जनहिताच्या विकासकामांसाठी योग्य विनियोग केल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळातही मंडणगडमध्ये आमच्याच पक्षाची सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी दरम्यान , शहरातील पायाभूत सुविधा आणि नागरी विकासाला चालना देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा १२ नोव्हेंबर २०२६ रोजी रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यामध्ये केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० योजनेअंतर्गत मंडणगड नगरपंचायतीची नळपाणी पुरवठा योजना, कृष्णानगर येथे नमो उद्यान विकसित करणे आणि मंडणगड एस.टी. बसस्थानक परिसरात सार्वजनिक शौचालय बांधणे या तीन महत्त्वपूर्ण विकासकामांचा समावेश होता.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, नगराध्यक्षा सोनल बेर्डे, जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, दापोली पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, संदीप राजपूरे, साधना बोतरे, माजी सभापती भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण, मुश्ताकर मिरकर, युवक अध्यक्ष साईराज सावंत, रमा बेलोसे, मुजीब रुमाणे, अपूर्वा जाधव, मुख्याधिकारी महादेव रोडगे, नगरसेविका राजश्री सापटे, मनीषा हातमकर, रेश्मा मर्चंडे, प्रियांका लेंडे, दिनेश लेंडे, हरेश मर्चंडे यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.












