मोपा विमानतळावर जाण्याचा बहाणा करून कार लंपास
सावंतवाडी : मोपा विमानतळावर येणाऱ्या मित्राला घेऊन येण्याचा बहाणा करून केरळमधील दोघा पर्यटकांनी निवास मालकाचा विश्वास संपादन करत मारुती वॅगनार कार पळवून नेल्याची घटना गुरुवारी (ता. १२) उघडकीस आली आहे. सावंतवाडी तालुक्यातील निरवडे-झरबाजारवाडी येथील ‘आनंदी पर्यटन निवास व न्याहारी केंद्रा’त हा प्रकार घडला असून, याप्रकरणी कार मालक महादेव भालचंद्र पवार (वय ४५) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून केरळमधील आशिष अँथोनी आणि नेहा आर. रवी (दोघेही रा. निरवार्थील, थन्नीरमुक्कम, अलप्पुझा, केरळ) यांच्याविरोधात फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महादेव पवार यांचे निरवडे-झरबाजारवाडी येथे ‘आनंदी पर्यटन निवास व न्याहारी केंद्र’ आहे. ११ नोव्हेंबर रोजी केरळ येथील आशिष अँथोनी व नेहा आर. रवी हे दोघे पर्यटक या केंद्रामध्ये राहण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी आमचा एक मित्र गोवा येथील मोपा विमानतळावर येणार असून, त्याला हॉटेलवर घेऊन येण्यासाठी तुमची कार द्यावी, अशी विनंती श्री. पवार यांच्याकडे केली. हे दोघे आपल्याच निवास केंद्रात मुक्कामी असल्याने ते नक्की परत येतील, या विश्वासाने श्री. पवार यांनी त्यांना गोव्याला जाण्यासाठी आपली मारुती वॅगनार कार (एमएच-०७-७९१४) आणि चावी दिली.
गुरुवारी, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हे दोघे पर्यटक कार घेऊन गेले. मात्र, दुपारपर्यंत ते परत न आल्याने महादेव पवार यांना संशय आला. त्यांनी दोघांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे फोन स्विच ऑफ असल्याचे आढळून आले. त्यानंतर श्री. पवार यांनी तात्काळ आपल्या मोबाईलवरून कारमधील जीपीएस (GPS) लोकेशन तपासले असता, सदर कार थेट केरळ राज्यातील कन्नूर येथे असल्याचे उघडकीस आले.
आपला विश्वास संपादन करून दोघांनी लबाडीने कार चोरून नेल्याची खात्री पटताच महादेव पवार यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान चोरीला गेलेल्या कारचा शोध लागला असून, या दोन्ही संशयित पर्यटकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक केरळच्या दिशेने रवाना करण्यात आले असल्याची माहिती सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे.













