सावंतवाडीत वन्यप्राण्यांच्या दहशतीला बसणार लगाम

सभापती प्रतीक बांदेकरांच्या पाठपुराव्यानंतर वनविभागाकडून फेन्सिंग

सावंतवाडी | प्रतिनिधी : शहरातील नागरी वस्त्यांमध्ये जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याने निर्माण झालेल्या भीतीदायक वातावरणाची दखल घेत, वनविभागाने शहरालगतच्या संवेदनशील भागात काटेरी कुंपण (फेन्सिंग) घालण्याचे काम पूर्ण केले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे सभापती प्रतीक बांदेकर यांनी याप्रकरणी वनविभागाच्या उप वनसंरक्षकांकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, यामुळे शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

      सावंतवाडी शहरातील सालईवाडा, माठेवाडा, शिरोडा नाका आणि जुना बाजार हे भाग थेट वनक्षेत्राला लागून आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात गवा रेडे, सांबर, रानडुक्कर आणि बिबट्या यांसारख्या हिंस्र वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण कमालीचे वाढले होते. यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विशेषतः रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले होते.

नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन नगरपरिषदेचे सभापती प्रतीक बांदेकर यांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी वनविभागाच्या उप वनसंरक्षकांना पत्र देऊन, वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील प्रवेश रोखण्यासाठी वनक्षेत्राच्या सीमेवर तातडीने बारबेड वायरचे (काटेरी कुंपण) घालण्याची मागणी केली होती. “नागरिकांचा जीव धोक्यात असताना प्रशासनाने विलंब न लावता उपाययोजना करावी,” असा आग्रह त्यांनी धरला होता.

प्रतिक बांदेकर यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत वनविभागाने तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून सालईवाडा व अन्य संवेदनशील भागांत फेन्सिंगचे काम हाती घेतले. हे काम आता पूर्ण झाले असून, यामुळे वन्यप्राण्यांना शहरात शिरकाव करणे कठीण होणार आहे.

वनविभागाच्या या निर्णयामुळे आणि बांदेकर यांच्या तत्परतेमुळे सालईवाडा, माठेवाडा आणि परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

 

*नागरिकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता : प्रतिक बांदेकर*

 

“शहरातील उपनगरीय भागात वन्यप्राण्यांमुळे भीतीचे वातावरण होते. नागरिकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. वनविभागाने माझ्या पत्राची दखल घेऊन तातडीने कुंपण घातल्यामुळे आता वन्यप्राण्यांच्या त्रासापासून रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.”

— प्रतीक बांदेकर, सभापती,

सावंतवाडी न.प.