कोकणचे सुपुत्र संतोष गांगण यांचा सलग दुसऱ्यांदा जागतिक हवामान परिषदेत भारताच्या शिष्टमंडळातून सहभाग!

COP31 च्या व्यासपीठावरून कोकणच्या विकासासाठी प्रयत्न; इकोसेन्सिटिव्ह गावांसाठी आंतरराष्ट्रीय निधी आणि शेतकऱ्यांसाठी कार्बन क्रेडिटवर विशेष भर

राजापूर प्रतिनिधी: राजापूर तालुक्यातील रायपाटचे रहिवाशी, कोकणचे सुपुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे नेते संतोष शांताराम गांगण यांना सलग दुसऱ्या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामान बदल परिषदेत (COP) भारताच्या शिष्टमंडळातून सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. गतवर्षी ब्राझील येथे झालेल्या COP30 नंतर यावर्षी तुर्कीतील अंताल्या येथे सुरू असलेल्या COP31 परिषदेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पर्यावरण संरक्षण गतिविधी टीममधून भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत.
या जागतिक व्यासपीठावर भारतीय संस्कृती आणि पर्यावरण यांच्यातील अतूट नाते तसेच ‘हरित भारत’ ही संकल्पना प्रभावीपणे मांडण्यावर भारतीय शिष्टमंडळाचा भर आहे. अल निनोसारख्या हवामानविषयक घटनांचा प्रभाव, अनियमित पर्जन्यमान, वाढते तापमान आणि दुष्काळ यांसारखी आव्हाने भारतासह महाराष्ट्रातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करत आहेत. हवामान बदलाचे हे संकट भारताने गांभीर्याने घेतले असून, त्यावर मात करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. भारताची ही भूमिका संतोष गांगण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडत आहेत. मात्र, संतोष गांगण यांनी या सहभागातून कोकणच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी मिळवण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
इकोसेन्सिटिव्ह गावांसाठी आंतरराष्ट्रीय निधीच्या संधी
कोकणातील अनेक गावे इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याने विकासकामांवर मर्यादा येतात. पर्यावरणाचे संरक्षण करतानाच स्थानिकांना रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्था, निधी देणाऱ्या यंत्रणा आणि जागतिक योजनांच्या माध्यमातून या गावांचा शाश्वत विकास कसा साधता येईल, याबाबत परिषदेत विविध संस्था व प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे.
कार्बन क्रेडिटमधून शेतकऱ्यांना उत्पन्नाची नवी संधी
पर्यावरणपूरक शेती, वृक्षसंवर्धन आणि कृषिवनशेतीच्या माध्यमातून कार्बन क्रेडिट मिळवून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येऊ शकते. ही संकल्पना कोकणातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य व तांत्रिक मार्गदर्शन मिळवण्याचे प्रयत्न संतोष गांगण करत आहेत.
जागतिक व्यासपीठ, केंद्रस्थानी कोकणचा विकास!
पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकास यांची सांगड घालून कोकणातील गावांना जागतिक योजनांशी जोडणे, स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे आणि शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध करून देणे, हा त्यांच्या सहभागामागील प्रमुख उद्देश आहे. जागतिक स्तरावरील संधींचा उपयोग कोकणच्या मातीच्या विकासासाठी करण्याच्या उद्देशाने संतोष गांगण यांचे प्रयत्न सुरू आहेत.