राजेवाडी–अंबडवे रस्त्याचे काम आठ वर्षांपासून अपूर्ण; नागरिकांचे हाल सुरूच!

संघर्ष समितीच्या वारंवार पाठपुराव्यानंतरही केवळ आश्वासनांची खैरात; आमदार-खासदारांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप

मंडणगड : राजेवाडी ते अंबडवे या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या आठ वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने परिसरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्याच्या कामासाठी संघर्ष समितीने अनेक वेळा संबंधित ठेकेदार अक्षय कन्स्ट्रक्शन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, प्रत्यक्ष काम पूर्ण करण्याऐवजी केवळ आश्वासने देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे यांनी केला आहे.
रस्त्याच्या खोदकामामुळे मंडणगडसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहनचालक, व्यापारी, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम रखडल्याने प्रवास करताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, गेल्या आठ वर्षांपासून रस्त्याचे काम पूर्ण होत नसताना स्थानिक आमदार आणि खासदारांनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे चित्र दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंबडवे या ऐतिहासिक गावाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असूनही त्याची दुरवस्था कायम आहे.
संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे यांनी या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आठ वर्षे उलटूनही राजेवाडी ते अंबडवे रस्त्याचे काम पूर्ण होत नसेल, तर हे काम नेमके कधी पूर्ण होणार? अक्षय कन्स्ट्रक्शनला काम पूर्ण करण्याची मुदत कोण देणार? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.