दाजी नांगरे यांच्या अंगणात आल्याचे सीसीटीव्हीत कैद
दोडामार्ग l प्रतिनिधी :तळकट येथे काल रात्री ग्रामस्थ दाजी नांगरे यांच्या अंगणात प्रवेश केला. बिबट्याचा लोकवस्तीमध्ये वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
तळकट येथे दाजी नांगरे यांच्या अंगणात बिबट्या काही काळ उभा होता. त्यानंतर तो तेथून निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. भरवस्तीत वन्यप्राण्याचा मुक्त संचार ग्रामस्थांसाठी संकट ठरत आहे.
मागील काही दिवसांपासून परिसरात रात्रीच्या वेळी जनावरांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. सीसीटीव्ही मध्ये बिबट्या कैद झाल्याने याला दुजोरा मिळाला आहे. दररोज सकाळी मुले शाळेसाठी घराबाहेर पडतात आणि गावात मोठ्या प्रमाणात फळबागायती असल्यामुळे शेतकऱ्यांना पहाटेपासून शेतीच्या कामांसाठी बाहेर जावे लागते. अशा परिस्थितीत बिबट्याचा वावर सुरू राहिला तर कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
गावातून रात्रीच्या वेळी बाहेर पडणे धोकादायक झाले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी तळकट ग्रामस्थांनी केली आहे.







