देवरूख (प्रतिनिधी) :
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालय, देवरुखच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी श्रमसंस्कार शिबिर सध्या माध्यमिक विद्यालय, सोनवडे येथे सुरू आहे. आदिवासी जननायक व थोर स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती प्रतिमापूजन व अभिवादन करून याठिकाणी साजरी करण्यात आली.
अभिवादन कार्यक्रमात विद्यार्थी स्वयंसेवक कु. तन्वी हिरवे(११वी संयुक्त- वाणिज्य) हिने जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष, सामाजिक कार्य आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान याविषयीच्या माहितीचा समावेश होता. या कार्यक्रमाला प्रा. मयुरेश राणे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. वसंत तावडे तसेच सहाय्यक अमोल वेलवणकर यांच्यासह शिबिरार्थी स्वयंसेवक उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये थोर समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची ओळख निर्माण व्हावी आणि त्यांच्या विचारांतून प्रेरणा मिळावी, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.













