कांदळगाव येथील तरुणाची आत्महत्या

मालवण (प्रतिनिधी) : मालवण येथील एका हॉटेल मध्ये कामास असलेल्या गणेश विजय कदम (वय ३३, रा. कांदळगाव बौद्धवाडी, ता. मालवण) या तरुणाने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कांदळगाव येथील गणेश कदम हा तरुण मालवण मधील एका हॉटेल मध्ये कामास होता. रविवारी रात्री दीड वाजेपर्यंत त्याने पाणी भरण्याचे काम केले. त्यानंतर आज सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान हॉटेल मालकास एका हॉटेल रूम मध्ये गणेश कदम याचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. रूम मधील बेड रनरच्या कापडच्या साहाय्याने फॅनला गणेश याने गळफास घेतलेला होता.

याबाबत मालवण पोलीसांना माहिती देण्यात आल्यावर डीवायएसपी दीपक शेलार, पीएसआय भगत, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर व जितेंद्र पेडणेकर यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त्यानंतर गणेश याचा मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. गणेश याच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे.