ज्येष्ठ दशावतारी कलाकार जीजी चोडणेकर यांचे निधन
वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास;
मालवण (प्रतिनिधी) :
कोकणच्या पारंपरिक दशावतार नाट्यकलेतील जेष्ठ व्यक्तिमत्त्व, देवबाग येथील ज्येष्ठ दशावतारी कलाकार महादेव सहदेव उर्फ जीजी चोडणेकर (वय ८१) यांचे सोमवारी दुपारी साडेतीन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
जीजी चोडणेकर यांनी तब्बल सहा दशके दशावतार कलेची सेवा करत आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. जाबुवंतासह विविध पौराणिक आणि खलनायकी भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारल्या. त्यांच्या अनेक भूमिका विशेष गाजल्या.
दशावतार कलेतील योगदानाबद्दल त्यांना झी गौरव पुरस्कार, माझा लोकराजा महोत्सवात सन्मान तसेच २०२० मध्ये राज्यस्तरीय सिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने कोकणच्या पारंपरिक दशावतार नाट्यसृष्टीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.













