विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाला निवेदन
जुने गतिरोधक सपाट झाल्याने अपघाताचा धोका
चिपळूण (प्रतिनिधी) : डीबीजे महाविद्यालयासमोरील रस्त्यावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी स्पष्टपणे दिसणारे गतिरोधक तातडीने बसवावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, चिपळूण कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाविद्यालयासमोरून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची ये-जा होते. या मार्गावर अवजड वाहनांसह अन्य वाहनांची वर्दळ असते. यापूर्वी बसविण्यात आलेले गतिरोधक सततच्या वाहतुकीमुळे सपाट झाले असून, ते वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून तांत्रिक निकषांनुसार गतिरोधक बसवावेत, अशी मागणी करण्यात आली. युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. युवासेना उपविभाग अधिकारी शाकीर अरकाटे यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, शहर सचिव प्रशांत मुळ्ये, युवासेना उपशहर अधिकारी आकाश कदम, झियाद चिकटे, इबाद बांगी आणि शुमेल उपस्थित होते. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित विभागाने या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा युवासेनेने व्यक्त केली आहे.










