रत्नागिरी : महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या प्रादेशिक बंदर अधिकाऱ्याला लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. संदीप विलासराव भुजबळ, वय ४७ वर्षे, असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांच्यासह खासगी इसम मिलिंद तुकाराम बनप, वय ५३ वर्षे, यालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार हे शिपिंग एजन्सीचा व्यवसाय करतात. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीतून जाणाऱ्या जहाजांना सेवा पुरविणे तसेच त्यांची दुरुस्ती करण्याचे काम त्यांच्या एजन्सीमार्फत केले जाते. जगबुडी पोर्ट येथे आलेल्या एका परदेशी जहाजाची समुद्रात चाचणी करण्यासाठी आवश्यक परवानगी आणि फायर फायटिंग ट्रायलची परवानगी देण्याच्या मोबदल्यात प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ यांनी खासगी इसम मिलिंद बनप याच्यामार्फत तक्रारदाराकडे ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
या संदर्भात तक्रारदाराने १३ नोव्हेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी येथे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.
१६ नोव्हेंबर रोजी खासगी इसम मिलिंद तुकाराम बनप याने तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ६० हजार रुपयांची लाच स्वीकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणातील प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ यांना १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ आणि ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रत्नागिरीतील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.













