रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या किर्तीनगर येथे 5 वर्षीय लहान मुलाला मंगळवार 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास भटक्या कुत्र्याने चावा घेतला. त्याला उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार करुन त्याला घरी सोडण्यात आले.
हैदर असिम अन्सारी (5,रा.किर्तीनगर कोकणनगर,रत्नागिरी) असे श्वान दंश झालेल्या मुलाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी हैदर हा घराबाहेर खेळत असताना तेथील भटक्या कुत्र्याने त्याच्या पायाचा चावा घेतला. हैदरने आरडा-ओरडा करताच त्याच्या नातेवाईकांनी आणि आजुबाजुच्या नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेत त्याची कुत्र्यापासून सूटका केली. काही महिन्यांपूर्वी पोलिस लाईन येथेही एका लहान मुलावर 5 ते 6 कुत्र्यांनी अचानकणे हल्ला केला होता. तो लहान मुलगाही घराबाहेर खेळत असतानाच त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ला चढवत त्याच्या सर्वांगावर अनेक ठिकाणी चावा घेत त्याला गंभिर जखमी केले होते.
लहान मुलांप्रमाणेच प्रौढ आणि दुचाकी चालकांना या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असून नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरी नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असून यापूर्वी त्यांच्या निर्बीजीकर्णावर करण्यात आलेल्या लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.










