मंत्री नितेश राणे यांच्या कठोर भूमिकेमुळे आणि विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने कार्यवाही यशस्वी; स्थानिक मच्छिमारांमध्ये समाधान
देवगड, : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने १५ दिवसांच्या आत सलग दुसरी कठोर कारवाई केली आहे. कर्नाटकातील मलप्पे बंदरातील ”हनुमा ध्याना” ही हायस्पीड ट्रॉलर नौका देवगडसमोरील सागरी हद्दीत पकडून जप्त करण्यात आली. ही नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून तिच्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
*मध्यरात्री समुद्रात थरारक कारवाई*
दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ०२.०० वाजता सुनियोजित गस्तीदरम्यान ही कारवाई झाली. आचरा समोरील समुद्रात सुमारे ९-१० नॉटिकल मैल अंतरावर ही नौका वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. विभागाची नौका पाहताच सदर नौकेने पळ काढला होता. सदर हायस्पीड नौकेस पाठलाग करून देवगड समोरील समुद्रात पकडण्यात आले. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ आणि सुधारित अधिनियम, २०२१ मधील तरतुदींनुसार नौका पाठलाग करून ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली. नौकेवर तांडेलसह एकूण सात खलाशी होते. नौका सुरक्षितपणे देवगड बंदरात आणल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कायदेशीर कार्यवाही सुरू होती. संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.
*जप्त नौकेची माहिती*
*नौकेचे नाव:* ” हनुमा ध्याना”
*नोंदणी क्रमांक:* IND-KA-02-MM-6013
*मालक:* श्री. सुनिल शेखर कोट्यान
*पत्ता*: जि. उडुपी, कर्नाटक
हायस्पीड ट्रॉलर नौकांकडून स्थानिक मच्छिमार यांची जाळी तोडली जात असल्याची तक्रार मालवण व देवगड परिसरातील स्थानिक मच्छिमारांनी केली होती. त्यानंतर विभागाने सक्रियपणे मलप्पी बंदरातील महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या नोकांविरुद्ध नो टोलनस पॉलिसीचा सातत्याने अवलंब केला आहे. मलपे येथील मासेमारी नौका अधिक आश्र्वशक्ती क्षमतेची असल्याचे समजते. तरीही अधिकाऱ्यांनी हार न मानता पाठलाग सुरू ठेवला आणि सुयोग्य तंत्रकौशल्ल्याचा वापर करून महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मासेमारी करणारी मलप्पी येथील हायस्पीड ट्रॉलर नौका विभागाच्या ताब्यात आली.
*मंत्री नितेश राणे यांचे बारकाईने लक्ष*
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची परप्रांतीय नौकांच्या घुसखोरीविरुद्ध त्यांनी सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे विभागाच्या कारवाईला बळ मिळाले असून स्थानिक मच्छिमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
*कार्यवाही करणारे पथक*
सदर कार्यवाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अंमलबजावणी अधिकारी(म.वि.अ.) श्री. प्रतिक महाडवाला यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ‘शीतल’ गस्ती नौकेद्वारे ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. सागरी सुरक्षा रक्षक दिवाकर जुवाटकर, संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर आणि स्वप्नील सावजी यांनी त्यांना महत्त्वपूर्ण सहकार्य केले. ही कारवाई सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग श्री. सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
*विभागाची कौतुकास्पद कामगिरी*
रात्रीच्या अंधारात भर समुद्रात, अधिक वेगवान नौकेचा पाठलाग करून तिला पकडणे सोपे नव्हते. अधिकाऱ्यां मार्फत १५ दिवसांत दुसऱ्यांदा केलेली कारवाई ही सुयोग्य नियोजन, तंत्रकौशल्य आणि कर्तव्यनिष्ठा खरोखरच कौतुकास्पद आहे. परप्रांतीय नौकेवर झालेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. यावरून विभागाची कारवाई सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध असल्याचे स्पष्ट होते.
या कारवायांमुळे स्थानिक मच्छिमारांचे आर्थिक हित सुरक्षित राहत आहे आणि सागरी जैवविविधतेचेही प्रभावी संरक्षण होत आहे. यामुळे स्थानिक मच्छिमार निर्धास्तपणे मासेमारी करू शकतील, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे. बेकायदा मासेमारीविरुद्ध ‘नो टोलनस पॉलिसी‘ यापुढेही कायम राहील, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.












