सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र क्रीडा प्रकोष्ठच्या कोकण सहसंयोजक पदी सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा माजी क्रीडा सभापती उदय नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या संघटनात्मक नियुक्ती पत्राद्वारे ही घोषणा केली असून, ही नियुक्ती तात्काळ लागू करण्यात आली आहे.
उदय नाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडीच्या सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात सक्रिय आहेत. नगरपरिषदेचे नगरसेवक आणि क्रीडा सभापती म्हणून काम करताना त्यांनी क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. विशेषतः, त्यांनी सावंतवाडीत ‘एम अकॅडमी’च्या माध्यमातून लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण अकॅडमी सुरू केली आहे. या अकॅडमीद्वारे मार्गदर्शन मिळालेल्या सावंतवाडी शहर, तालुका तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक युवा खेळाडूंनी राज्यस्तरापर्यंत मजल मारून आपली चमक दाखवली आहे.
क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या याच तळागाळातील कार्याची आणि युवा खेळाडूंना घडवण्याच्या योगदानाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर कोकण विभागाची ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
तसेच सावंतवाडीसह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












