लांजा-राजापूरमधील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी आमदार किरण सामंत फील्डवर
लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या, रेल्वे स्थानकांवरील अपुऱ्या सोयीसुविधा, रस्ते, रेल्वे गाड्यांचे थांबे, फलाटांची स्थिती तसेच स्थानिक नागरिकांच्या विविध मागण्यांचा सविस्तर अहवाल खासदार नारायण राणे यांच्याकडे सादर करून त्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी आडवली, विलवडे, वेरवली आणि निवसर येथील रेल्वे प्रवासी, ग्रामस्थ यांना दिली.
लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी मंगळवारी लांजा आणि राजापूर तालुक्यातील विविध रेल्वे स्थानकांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यामध्ये लांजा तालुक्यातील आडवली, विलवडे, वेरवली आणि निवसर येथील रेल्वे प्रवाशांच्या समस्या, रेल्वे स्थानकांवरील अपुऱ्या सोयीसुविधा, रेल्वे गाड्यांचे थांबे, फलाटांची स्थिती तसेच स्थानिक नागरिकांच्या विविध मागण्यांचा सविस्तर आढावा घेतला.
खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाहणी दौरा करण्यात आला असून, या दौऱ्यात निदर्शनास आलेल्या समस्या आणि आवश्यक विकासकामांचा सविस्तर अहवाल खासदार नारायण राणे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून संबंधित प्रस्तावांना मंजुरी मिळवून देण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल. स्थानिक नागरिक आणि रेल्वे प्रवाशांच्या रास्त मागण्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आमदार किरण सामंत यांनी स्पष्ट केले.
या दौऱ्यामध्ये लांजा तालुक्यातील निवसर, आडवली, वेवली आणि विलवडे, तर राजापूर तालुक्यातील सौंदळ आणि राजापूर रेल्वे स्थानकांची पाहणी करण्यात आली. प्रत्येक स्थानकावरील सद्यस्थिती, प्रवाशांची संख्या, उपलब्ध सुविधा आणि भविष्यात आवश्यक असणाऱ्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. रेल्वे स्थानकांवर आवश्यक एक्स्प्रेस आणि अन्य रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी पाठपुरावा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच फलाटांची दुरुस्ती, नवीन फलाटांची उभारणी, फलाटांचे सुशोभीकरण, प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा आणि रेल्वे स्थानकांच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याबाबत आवश्यक सूचना करण्यात आल्या.
रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या अप्रोच रोडची दुरुस्ती व सुधारणा, स्थानक परिसरातील साईटसंबंधित अडचणी, नियमित पाणीपुरवठा आणि परिसरातील स्वच्छता या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. प्रवाशांना तिकीट आरक्षणाची सुविधा, आवश्यक रेल्वे कोटा, सुसज्ज प्रतीक्षालय आणि स्थानकांवर बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची ने-आण करणाऱ्या रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र निवारा शेड उभारणे, स्थानक परिसरात स्वच्छतागृहांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करणे या मागण्यांचाही विचार करण्यात आला.
रेल्वे प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना दाखले मिळण्यात येणाऱ्या अडचणी, प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारासंबंधीचे प्रश्न आणि भूसंपादनासंदर्भातील प्रलंबित बाबी यांचाही आढावा घेण्यात आला. वेरवली येथे रेल्वे रूळ ओलांडताना प्रवाशांना होणारा त्रास आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता आवश्यक त्या ठिकाणी पादचारी पूल उभारण्याची मागणी करण्यात आली.
रेल्वे स्थानकांवर महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे आमदारांनी नमूद केले. सुरक्षित प्रतीक्षालय, स्वच्छतागृहे, बसण्याची व्यवस्था, सुरक्षित ये-जा आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
या दौऱ्यात समोर आलेल्या सर्व समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवून संबंधित रेल्वे प्रशासन आणि शासन दरबारी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून या विकासकामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी भूमिका आमदार किरण सामंत यांनी यावेळी मांडली.
आमदार किरण सामंत यांच्या या विशेष पाहणी दौऱ्यामध्ये लांजा पंचायत समिती सभापती सौ मानसी आंबेकर, लांजा नगराध्यक्ष सावली कुरूप, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई , शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक सहभागी झाले होते. याचबरोबर लांजा एसटी आगार व्यवस्थापक प्रकाश झोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, रेल्वे अधिकारी श्री म्हातोणकर, श्री कांबळे, वेरवलीच्या सरपंच वेदा कोळवणकर, पंचायत समिती सदस्य साक्षी चव्हाण, वेरवली शाखा प्रमुख दिनेश पवार, माजी सरपंच उमेश पवार, शाखाप्रमुख अशोक जाधव, उपविभाग प्रमुख रवींद्र शिंदे, यांच्यासह आडवली, विलवडे, निवसर, येथील स्थानिक ग्रामस्थ, रेल्वे प्रवासी तसेच खात्याचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.













