ज्ञानदीप फार्मसी महाविद्यालयाचे चार नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार; विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण व रोजगाराच्या नव्या संधी

औद्योगिक प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, इंटर्नशिप आणि कॅम्पस प्लेसमेंटला मिळणार चालना

खेड (प्रतिनिधी) : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानदीप औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, बोरज-खेड यांनी शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने चार नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार (MoU) केले आहेत. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या या करारांमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण, इंटर्नशिप, संशोधन प्रकल्प, कौशल्य विकास तसेच रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.
महाविद्यालयाने ब्रह्मचैतन्य आयुर्वेद हॉस्पिटल, देवरुख; प्रासन फूड्स प्रा. लि., रत्नागिरी; अमसार प्रा. लि. (गोवा उत्पादन केंद्र), कोलवळे, गोवा आणि ॲडलर हेल्थकेअर प्रा. लि., साडवली या चार संस्थांसोबत सामंजस्य करार केले आहेत. या करारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना औषधनिर्मिती, औषधी वनस्पती संशोधन, वैद्यकीय उपकरण निर्मिती, गुणवत्ता नियंत्रण आणि आधुनिक औद्योगिक प्रक्रियांबाबत प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
ब्रह्मचैतन्य आयुर्वेद हॉस्पिटल, देवरुख यांच्या सहकार्याने आयुर्वेदिक औषधनिर्मिती, बहुऔषधी वनस्पतीजन्य औषधांचे संशोधन, सूक्ष्मजीवशास्त्रीय परीक्षण तसेच औषधांच्या प्रतिजैविक क्षमतेचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक आरोग्यसेवा, रुग्णालयीन कामकाज आणि संशोधन क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव मिळणार आहे. या सहकार्यामध्ये डॉ. विनय वासुदेव धवळ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
प्रासन फूड्स प्रा. लि., रत्नागिरी या औषधनिर्मिती क्षेत्रातील संस्थेसोबत झालेल्या करारामुळे विद्यार्थ्यांना औषधनिर्मितीच्या विविध प्रक्रियांची माहिती आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार आहे. औषधी गोळ्या, कफ व सर्दीवरील औषधनिर्मिती, उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, गुणवत्ता हमी आणि पॅकेजिंग या विभागांमध्ये विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय संशोधन, तज्ज्ञ व्याख्याने आणि रोजगाराच्या संधीही या कराराचा महत्त्वपूर्ण भाग आहेत.
अमसार प्रा. लि., गोवा या वनस्पतीजन्य अर्क आणि आयुर्वेदिक उत्पादन क्षेत्रातील संस्थेसोबत झालेल्या करारामुळे विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींचे निष्कर्षण, फाइटोकेमिकल संशोधन, वनस्पतीजन्य घटकांचे प्रमाणीकरण तसेच आधुनिक विश्लेषण तंत्रज्ञानाचा अभ्यास करता येणार आहे. HPLC, HPTLC आणि UV-Vis यांसारख्या आधुनिक उपकरणांच्या वापराचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार असून, GMP आधारित औषधनिर्मिती प्रक्रियेची माहितीही दिली जाणार आहे. इंटर्नशिप, कौशल्य विकास कार्यशाळा, संशोधन प्रकल्प आणि पात्र विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.
ॲडलर हेल्थकेअर प्रा. लि., साडवली या वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रातील संस्थेसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, निर्जंतुकीकरण प्रक्रिया, पॅकेजिंग, नियामक बाबी आणि गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कार्यशाळा, संशोधन उपक्रम आणि कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्यांना चालना मिळणार आहे.
या चार सामंजस्य करारांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष औद्योगिक व व्यावसायिक अनुभव मिळणार आहे. तसेच प्राध्यापकांसाठी संयुक्त संशोधन प्रकल्प, तज्ज्ञ व्याख्याने, औद्योगिक भेटी आणि कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करण्याची संधी निर्माण होणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य जागृती, आरोग्य तपासणी शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठीही संबंधित संस्थांचे सहकार्य लाभणार आहे.
या सामंजस्य करारांवर ज्ञानदीप फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित नगरे यांनी महाविद्यालयाच्या वतीने स्वाक्षरी केली. ब्रह्मचैतन्य आयुर्वेद हॉस्पिटलच्या वतीने डॉ. विनय धवळ, प्रासन फूड्स प्रा. लि.च्या वतीने संचालक श्री. मयुरेश प्रभू, अमसार गोवा प्रा. लि.च्या वतीने चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. मंगेश प्रभुदेसाई आणि फॅक्टरी मॅनेजर डॉ. सुप्रिया जिरगे, तर ॲडलर हेल्थकेअर प्रा. लि.च्या वतीने अधिकृत प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
या उपक्रमाबद्दल ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमण तलाठी, सचिव श्री. माधव पेठे, संस्थापक सचिव श्री. प्रकाश गुजराथी, जनसंपर्क अधिकारी श्री. दीपक लढ्ढा, गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष श्री. अनिल शिवदे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. रूपल पाटणे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. सुजित नगरे यांनी या सामंजस्य करारांमुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरजांनुसार कौशल्ये आत्मसात करता येतील, संशोधनवृत्ती विकसित करता येईल आणि रोजगारक्षम बनण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, व्यावहारिक आणि रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने हे सामंजस्य करार महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.