दुचाकीस्वाराचा निष्काळजीपणा नडला; स्वतःच्याच दुखापतीस कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल
खेड (प्रतिनिधी):
रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता हयगयीने दुचाकी चालवून स्वतःलाच गंभीर जखमी करून घेणाऱ्या एका दुचाकीस्वारावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:४० वाजेच्या सुमारास खेड ते बहिरवली जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नांदगाव-माळवाडी (गुलामवाडी) येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शाहिद इसाक मुकादम (रा. महाड नाका, ड्रीम पॅराडाईज बिल्डिंग, खेड) हा आपल्या ताब्यातील दुचाकी (क्रमांक MH 08 AR 2556) घेऊन जात होता. यावेळी रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने वाहन वेगाने व निष्काळजीपणाने चालवले. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खोलगट भागात कोसळली. या अपघातात शाहिद मुकादम याला किरकोळ व गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. स्वतःच्याच निष्काळजीपणामुळे स्वतःच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार अलीमोद्दीन बदीयोद्दीन शेख (नेमणूक खेड पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली असून, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री ००:०५ वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.














