खेडमध्ये २४ ते २६ डिसेंबरदरम्यान ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धा; विजेत्याला एक लाखांचे पारितोषिक

रामदास आठवले आणि सुशांत सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन; सामाजिक उपक्रमांचाही समावेश

खेड (प्रतिनिधी) : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आणि कोकण प्रदेश युवक आघाडीचे अध्यक्ष सुशांत सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक २०२६’ या भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), तालुका खेड यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा २४, २५ आणि २६ डिसेंबर २०२६ रोजी राभी धोत्रे गुरुजी क्रीडा नगरी, नगरपरिषद क्रीडांगण, महाड नाका, खेड येथे पार पडणार आहे.
खेड तालुक्यातील क्रिकेटप्रेमी खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये रोख आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या संघाला ५० हजार रुपये रोख व आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि सामनावीर असे विविध वैयक्तिक पुरस्कारही ठेवण्यात आले आहेत.
स्पर्धेत गाव टू गाव गटातील संघांसाठी सहा हजार रुपये प्रवेश फी, तर शहरी गटातील संघांसाठी आठ हजार रुपये प्रवेश फी निश्चित करण्यात आली आहे. खेड तालुक्यासह परिसरातील विविध क्रिकेट संघांनी स्पर्धेत सहभागी होऊन क्रिकेटचा थरार अनुभवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रामदास आठवले आणि सुशांत सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ क्रिकेट स्पर्धाच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. कळबणी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप, खेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फळवाटप, तसेच वेरळ येथील विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय आहार, फळे आणि खाऊच्या बास्केटचे वाटप करण्यात येणार आहे.
सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात योगदान देण्याच्या उद्देशाने या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, वाढदिवस समाजोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.
या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), तालुका खेड यांच्या वतीने करण्यात येत आहे. आयोजनासाठी कोकण सरचिटणीस सी. आर. कांबळे, तालुका अध्यक्ष बाबाराम पवार, कार्याध्यक्ष मिलिंद तांबे, जिल्हा पर्यावरण अध्यक्ष ॲड. सुरेंद्र तांबे, जिल्हा संपर्कप्रमुख गौतम तांबे (सवणसकर), जिल्हा कोषाध्यक्ष गौतम तांबे (तळवटकर), युवक अध्यक्ष विकास धुत्रे आणि सरचिटणीस जितेंद्र तांबे यांचा पुढाकार आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी बाबाराम पवार, मिलिंद तांबे, सुरेंद्र तांबे, विकास धुत्रे आणि जितेंद्र तांबे यांच्याशी संपर्क साधावा. खेड तालुक्यातील क्रिकेटप्रेमींनी या भव्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष बाबाराम पवार यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना केले.