सावर्डे विद्यालयात इंदिरा गांधी जयंती उत्साहात साजरी

चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने इंदिरा गांधी यांच्या बालपणापासून ते देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यांची ध्येयासक्ती, कामाप्रती असलेली निष्ठा, देशप्रेम तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेची भावना जोपासावी, असे आवाहन सहाय्यक शिक्षिका सौ. मेस्त्री यांनी केले.
यावेळी विद्यार्थिनी कु. अनघा कांबळे हिने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानिमित्त श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारे आकर्षक भित्तीपत्रक तयार करण्यात आले होते. या भित्तीपत्रकाचे उद्घाटन पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जागतिक पुरुष दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील सर्व पुरुष शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सौ. श्रेया राजेशिर्के व सौ. सिद्धी सावंत यांनी केले. शिक्षक सुधीर कदम व रोहित गमरे यांनी आभार मानले.