नमन खेळांद्वारे निधी संकलन करून पंचक्रोशीतील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे

साटवली पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघटनेच्या बैठकीत विविध ठराव

लांजा (प्रतिनिधी) : माजी विद्यार्थी संघटनेला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी पारंपरिक ‘नमन खेळे’ आयोजित करून निधी उभारणे आणि त्यातून पंचक्रोशीतील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्या संदर्भातील चर्चा आणि ठराव
साटवली पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या बैठकीत करण्यात आला.
साटवली पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक विलेपार्ले (पूर्व) येथील शहाजी राजे मार्गावरील विष्णू प्रसाद सोसायटी (नवपाडा) येथील चामुंडा बँक्वेट हॉलमध्ये नुकतीच उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत संघटना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी पारंपरिक ‘नमन खेळे’ आयोजित करून निधी उभारणे, त्यातून पंचक्रोशीतील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे तसेच हायस्कूल आणि महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याबाबत सखोल चर्चा होऊन ठराव घेण्यात आले.
माजी विद्यार्थ्यांना संघटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सक्रिय करून शैक्षणिक व सामाजिक प्रवाहात त्यांचे योगदान वाढवण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. त्यानुसार शिक्षणप्रेमी दानशूर व्यक्ती तसेच निवृत्त गुरुजनांचा सन्मान सोहळा आयोजित करणे, गुणवंत व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती व आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणे आणि शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी संस्थेच्या सहकार्याने ठोस नियोजन करणे, असे निर्णय घेण्यात आले.

‘नमन खेळे’सारख्या पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा होणारा निधी पूर्णपणे विद्यार्थी कल्याण व शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.चामुंडा बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या या सभेचे नियोजन अध्यक्ष दीपक चंदुरकर यांनी केले होते. सभागृहाची व्यवस्था, उपस्थितांच्या येण्या-जाण्याची सोय आणि संपूर्ण कार्यक्रमाची सुसूत्रता त्यांनी अत्यंत काटेकोरपणे व कौतुकास्पद पद्धतीने सांभाळली.
या बैठकीस दीपक चंदुरकर, शाम बापेरकर, प्रकाश चंदुरकर, किशोर जुलूम, संतोष पड्यार, जितेंद्र चव्हाण, मनोज आग्रे, सुधाकर कुष्टे, दीपक तरळ, रतन जाधव, हरिश्चंद्र मांडवकर, सचिन मेस्त्री आणि अमोल शिरवाडकर आदी उपस्थित होते. आगामी उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.