कै. केशव रामचंद्र पाटणकर, तसेच कै. हरी विष्णू लिमये ह्यांना आदरांजली
रत्नागिरी :
कार्तिक महिन्यामध्ये ठिकठिकाणी सण उत्सव साजरे होत असतात. त्याच प्रमाणे दि. २३ नोव्हेंबर २०२६, सोमवार रोजी सायंकाळी ठीक ६ ते ८ ह्या वेळेत रत्नागिरी मध्ये अभंगनाद कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. हा कार्यक्रम अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आणि स्वरार्पण ह्या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. स्वरार्पण चे संचालक श्रीधर पाटणकर हे त्यांच्या आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा कार्यक्रम करत आहेत. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रीधर पाटणकर ह्यांचे आजोबा भजनी कलाकार कै. केशव रामचंद्र पाटणकर, तसेच साप्ताहिक सत्यशोधक चे कै. हरी विष्णू लिमये ह्यांना आदरांजली वाहिली जाणार आहे. कै. केशव रामचंद्र पाटणकर हे संगमेश्वर तालुक्यातील सुप्रसिद्ध भजनी कलावंत होते तसेच कै. हरी विष्णू लिमये हे 150 वर्ष यशस्वी पणे सुरू असलेल्या सत्यशोधक प्रेस चे पार्टनर होते. ह्या कार्यक्रमामध्ये ठाण्याच्या सुप्रसिद्ध युवा गायिका सौ. सानिका राजवाडे नातू ह्या देखील गायन सादर करणार आहेत. कार्यक्रमाला तबला साथसंगत निखील रानडे, संवादिनी साथसंगत संतोष आठवले, ऑर्गन साथसंगत महेश दामले, पखवाज साथसंगत कैलास दामले, तालवाद्य साथसंगत अथर्व घाणेकर हे करणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सई ओक ह्या करणार आहेत. आत्ता पर्यंत स्वरार्पण च्या प्रत्येक उपक्रमांना रसिक श्रोत्यानी भरभरून दाद दिली आहे, त्याच प्रमाणे ह्या ही उपक्रमाला रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कलाकारांचा आनंद द्विगुणित करावा अशी विनंती स्वरार्पण चे श्रीधर पाटणकर आणि अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.













