ग्रामीण भागातील पाच गुणवंत बालकांचा ‘सवित्र बाल पुरस्कार २०२६’ ने होणार गौरव!

कै. वसंत दत्तात्रय सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माध्यमिक विद्यालय नाटळ येथे सोमवारी पुरस्कार सोहळा!

विज्ञान, अभिनय, क्रीडा, बुद्धिमत्ता आणि वक्तृत्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांची निवड!

कणकवली : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, गुणवत्तेला आणि विशेष प्राविण्याला हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या यशातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाल गुणवंतांचा नावलौकिक वाढावा, या उद्देशाने कै. वसंत दत्तात्रय सावंत यांच्या स्मरणार्थ ‘सवित्र बाल पुरस्कार सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. राजवाडी उत्कर्ष मंडळ नाटळ (मुंबई) संचलित माध्यमिक विद्यालय नाटळ यांच्या वतीने आणि सौ. उमा भालचंद्र सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला हा पुरस्कार सोहळा सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता माध्यमिक विद्यालय नाटळ येथे संपन्न होणार आहे.

 

या पुरस्कार सोहळ्याचे यंदा दुसरे वर्ष असून, जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांचाही शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

 

यंदाच्या ‘सवित्र बाल पुरस्कार २०२६’ साठी विज्ञान क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल कु. अश्मित शिल्पा शैलेश मुळीक (कळसुली हायस्कूल), अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कु. सावी विधी वैभव मुद्राळे (कासार्डे हायस्कूल), क्रीडा क्षेत्रातील विशेष प्रावीण्याबद्दल कु. कबीर नबीला नवीद हेरेकर (शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल, सावंतवाडी), अलौकिक बुद्धिमत्तेबद्दल कु. अवनीश शिल्पा उमेश देसाई (जि. प. शाळा, कळणे नं. ३) आणि वक्तृत्व कलेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कु. सिद्धी संध्या सुनील झोरे (माध्यमिक विद्यालय नाटळ) यांची निवड करण्यात आली आहे.

 

ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेणे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणे हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांच्या यशातून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रगती साधावी, स्वतःमधील कौशल्ये विकसित करावीत आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे.

 

हा पुरस्कार सोहळा श्रीमान विजयराव कृष्णाजी सावंत (माजी आमदार तथा विधान परिषद सदस्य) यांच्या अध्यक्षतेखाली, तर श्री. भालचंद्र वसंत सावंत (अध्यक्ष, राजवाडी उत्कर्ष मंडळ, नाटळ-मुंबई) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

 

या प्रेरणादायी सोहळ्यास पंचक्रोशीतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि ग्रामस्थांनी सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता माध्यमिक विद्यालय नाटळ येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करावे, असे आवाहन माध्यमिक विद्यालय नाटळ प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.