दापोली विशेष प्रतिनिधी :
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-मंडणगड मार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, सुरेंद्र गोरिवले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते दापोली तालुक्यातील कलकाई कोंड येथील रहिवासी होते.
शनिवारी सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास खेर्डी येथे हा अपघात घडला. मंडणगडहून दापोलीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसची आणि दापोलीहून मंडणगडच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची धडक झाली. यावेळी दुचाकीस्वार एसटी बसच्या मागील चाकाखाली गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा आणि पुढील तपास सुरू असून, अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांच्या कार्यवाहीनंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृताच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.













