खेडमध्ये HP गॅस ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न? ‘गॅस सेवर’च्या नावाखाली ३ ते ३.५ हजारांची मागणी; वितरकांकडून सावधानतेचे आवाहन

खेड (प्रतिनिधी) : खेड शहर व परिसरातील HP गॅस ग्राहकांना ‘सूर्या गॅस सेवर’ नावाचे उपकरण बसवून देण्याच्या बहाण्याने काही अपरिचित व्यक्तींकडून ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये वसूल केले जात असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकाराबाबत HP गॅस डीलर खेडचे अमोल भाई बुटला यांनी ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
काही व्यक्ती घरोघरी जाऊन गॅस बचत करणारे उपकरण बसवून देण्याचे सांगत ग्राहकांकडून पैसे मागत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, HP गॅस वितरकाकडून अशा प्रकारच्या उपकरणांची विक्री अथवा बसविण्यासाठी कोणालाही पाठवण्यात आलेले नाही. तसेच HPCL कंपनीचे ‘सूर्या गॅस सेवर’ नावाचे कोणतेही अधिकृत उपकरण नसल्याचे वितरकांनी स्पष्ट केले आहे.
अशा प्रकारे अनधिकृत उपकरण गॅस सिलिंडर किंवा शेगडीला जोडल्यास गॅस गळती, आग किंवा अन्य दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून गॅस जोडणीमध्ये बदल करू नये किंवा कोणतेही अनधिकृत उपकरण बसवून घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशा प्रकारची व्यक्ती आपल्या घरी आल्यास त्यांना उपकरण बसविण्यास परवानगी देऊ नये. संबंधित व्यक्तीबाबत तात्काळ HP गॅस डीलर कार्यालयाला माहिती द्यावी. ग्राहकांनी सतर्क राहून संभाव्य आर्थिक फसवणूक आणि सुरक्षेचा धोका टाळावा, असे वितरकांनी स्पष्ट केले आहे.
ग्राहकांच्या तक्रारी व अधिक माहितीसाठी HP गॅस डीलर, खेड यांनी कार्यालयीन संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. सकाळी १० ते दुपारी १.३० आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ६ या वेळेत ८७६७९०१३४२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच दुपारी २.३० ते सायंकाळी ६ या वेळेत ८४२१५०४३२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गॅस गळती किंवा शेगडी दुरुस्तीच्या कामासाठी ७०५८५२७५४२ हा स्वतंत्र संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.
HP गॅस डीलर, खेड यांनी ग्राहकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवता, कोणतेही उपकरण बसवण्यापूर्वी अधिकृत वितरकांकडून खात्री करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.