खेड (प्रतिनिधी) – माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील देवघर सोंडे ग्रामपंचायतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने ग्रामपंचायतीने केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या वतीने हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला.
दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी डोह – सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी, मुंबई येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात देवघर सोंडे ग्रामपंचायतीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार, विधानसभा अध्यक्ष श्री राहुलजी नार्वेकर आणि पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायतीला सन्मानचिन्ह, सन्मानपत्र तसेच 50 लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील देवघर सोंडे ग्रामपंचायतीने मागील दोन वर्षांपासून गावातील सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवले. भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या निसर्गाच्या पंचमहाभूतांवर आधारित विविध उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि हवामान बदलाबाबत जनजागृती करण्यात ग्रामपंचायतीने मोलाचे योगदान दिले. शाश्वत जीवनशैलीचा संदेश गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात पंचायत, शाळा, अंगणवाडी, बचत गट आणि विविध समित्यांचा सक्रिय सहभाग लाभला.
हे अभियान महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबवले जाते. पर्यावरणाचे जतन व संरक्षण करत नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून देवघर सोंडे ग्रामपंचायतीने हा उद्देश प्रत्यक्ष कृतीतून साध्य करून दाखवला आहे.
सदर अभियान यशस्वी करण्यासाठी कुशल मार्गदर्शन समितीचे माननीय गटविकास अधिकारी श्री गणेश मंडलिक, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री विजय करपे, विस्तार अधिकारी श्री नाथा पाटील व श्री देसाई, कृषी विस्तार अधिकारी श्री दिनेश राणे, तसेच श्री गावडे आणि श्री लोहार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
ग्रामपंचायतीच्या पातळीवर सरपंच श्री सुनील बाबुराव मोरे, उपसरपंच श्री रविंद्र दत्ताराम इंगळे, ग्रामपंचायत अधिकारी श्री दीपक तुकाराम कदम, माजी उपसरपंच श्री नामदेव राजाराम सोंडकर, माजी उपसभापती श्री रविंद्र मोरे, तसेच सर्व सभासद, कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, पोलीस पाटील, बचत गट सदस्य, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ यांच्या सामूहिक नेतृत्वाखाली हे अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले.
राज्यात तृतीय क्रमांक पटकावल्यामुळे आणि 50 लाख रुपयांच्या बक्षिसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील देवघर सोंडे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे यश पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने गावाने उचललेल्या सामूहिक पावलांचे प्रतीक ठरत असून इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरणारे आहे.












