मार्लेश्वर तीर्थक्षेत्री मंदिराच्या गाभाऱ्यात दगड कोसळला; दोन भाविक बालंबाल बचावले

तज्ज्ञांची पाहणी सुरू असतानाच घडली घटना; मार्लेश्वर तीर्थक्षेत्री भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या मार्लेश्वर येथे भाविकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढवणारी आणखी एक घटना घडली आहे. मार्लेश्वर तीर्थक्षेत्री गुहेतील गाभाऱ्यात अचानक दगड कोसळल्याची घटना शुक्रवारी दु. १ वाजण्याच्या सुमारास घडली असून, यावेळी मंदिरात उपस्थित असलेले दोन भाविक सुदैवाने बालंबाल बचावले आहेत. विशेष म्हणजे, मार्लेश्वर परिसरातील डोंगराच्या सुरक्षिततेबाबत तज्ज्ञांकडून पाहणी सुरू असतानाच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञ पथकाकडून या डोंगराची तांत्रिक पाहणी सुरू होती. दगड कोसळल्याची घटना घडताच या तज्ज्ञांनी तात्काळ गाभाऱ्यात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

मार्लेश्वर तीर्थक्षेत्र हे कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये वसलेले हे देवस्थान धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथे घडणाऱ्या घटनांमुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही दिवसांपूर्वी मार्लेश्वर येथे डोंगरावरून दगड कोसळून सांगली येथून कुटुंबासमवेत दर्शनासाठी आलेल्या सहा वर्षीय ऋत्वी पाटील या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेत अन्य दोघेजण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर मार्लेश्वर परिसरातील डोंगराची स्थिती, संभाव्य दरड कोसळण्याचा धोका आणि भाविकांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर संबंधित तज्ज्ञांकडून मार्लेश्वर परिसराची पाहणी सुरू असतानाच मंदिराच्या गाभाऱ्यात दगड कोसळण्याची घटना घडली. मंदिराच्या गाभाऱ्यासारख्या महत्त्वाच्या आणि भाविकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी दगड कोसळल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या वेळी दोन भाविक तेथे उपस्थित होते. मात्र, सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. काही क्षणांचा फरक पडला असता तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता आली नसती. तज्ज्ञांची पाहणी सुरू असतानाही अशा प्रकारची घटना घडत असल्याने मार्लेश्वर परिसरातील डोंगर आणि मंदिर परिसराच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ पाहणी करून किंवा बैठका घेऊन हा प्रश्न सुटणार नाही, तर प्रत्यक्ष धोकादायक ठिकाणांची ओळख पटवून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.