खेड (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती आणि कल्पकतेला चालना मिळावी या उद्देशाने खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल.टी.टी. इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज, खेड येथे शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित तब्बल ६० विज्ञान प्रयोग व प्रतिकृती सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून तसेच विज्ञान प्रतिकृती मांडण्यात आलेल्या दालनांचे फीत कापून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना प्रत्यक्ष प्रयोगांच्या स्वरूपात मांडण्याची संधी मिळाली.
प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी शेती तंत्रज्ञान, सौर ऊर्जा प्रणाली, पाण्याचे शुद्धीकरण, ज्वालामुखी उद्रेक, जलव्यवस्थापन, आरोग्य यांसह विविध वैज्ञानिक विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण आणि आकर्षक प्रतिकृती तयार केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी केवळ प्रतिकृती तयार न करता त्यामागील वैज्ञानिक संकल्पना, कार्यपद्धती आणि उपयोग यांची माहिती उपस्थितांना आत्मविश्वासपूर्वक समजावून सांगितली. त्यांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक जिज्ञासा, कल्पकता आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोन दिसून आला.
विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी पालक, माजी विद्यार्थी आणि प्रशालेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. प्रत्येक दालनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतींची माहिती जाणून घेण्यासाठी उपस्थितांनी उत्सुकता दाखवली. काही प्रतिकृती विशेष लक्षवेधी ठरल्या असून, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे आणि मेहनतीचे उपस्थितांनी कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञान प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून समजून घेण्याची संधी मिळत असून, त्यांच्या आत्मविश्वासातही वाढ होत असल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमाला परवेज मुकादम, माजिद खतीब, समन्वयक सेबास्टियन जॉय, समन्वयिका एल्सी मॅडम, मुख्याध्यापक जी. बी. सारंग, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पी. एस. कुडाळकर, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष उत्तमकुमार जैन तसेच पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम, प्रेमळ चिखले, जयेश गुहागरकर, चंद्रकिरण वैद्य, डॉ. पुष्कर नेने आणि विलीन पाटणे यांनी विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. प्रदर्शनातील विज्ञान प्रतिकृतींचे परीक्षण आदिब मुकादम, पूजा जाधव, रुपाली कांचनकोट्टी, कादिरी, मधू वैद्य आणि गौरी पाटणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आफरीन कौचाली यांनी केले, तर प्रदर्शनाचे नियोजन सतीश योगी आणि सायली कांबळे यांनी केले.
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आणि त्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित हे विज्ञान प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.













