हवामानाचा नियमीत व अचूक वेध, कृषी सल्ल्याचा योग्य मेळ आणि शेतकऱ्यांच्या निर्णयाला शास्त्रीय बळ हेच कृषी स्वयंचलित हवामान केंद्राचे खरे महत्त्व!: डॉ संजय भावे यांचे प्रतिपादन

▪️मुळदे येथे कृषी-स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन

कुडाळ | प्रतिनिधी :                    सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जाणवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली व भारतीय हवामान विभाग यांच्या सह-सामंजस्य करारातुन क्षेत्रिय कृषि हवामान केंद्र, ग्रामीण कृषि मौसम सेवा, मुळदे अंतर्गत कृषी-स्वयंचलित हवामान केंद्राची नव्याने स्थापना करण्यात आली असुन सदर कृषी स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय भावे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना डॉ संजय भावे म्हणाले, मुळदे येथे कृषी स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन करताना मला विशेष आनंद होत आहे. आज शेतीसमोर सर्वांत मोठे आव्हान कोणते असेल, तर ते म्हणजे बदलते आणि अनिश्चित हवामान. विशेषतः कोकणातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाचे प्रमाण, त्याचे वितरण, पावसातील खंड आणि तापमानातील बदल यांचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होत असतो. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणवत असलेली दुष्काळसदृश परिस्थिती ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. कोकण हा अतिवृष्टीसाठी ओळखला जाणारा प्रदेश असला, तरी पावसाचे असमान वितरण आणि पावसातील दीर्घ खंड यामुळे शेतीला पाण्याची टंचाई भेडसावू शकते. त्यामुळे केवळ किती पाऊस पडला हे जाणून घेणे पुरेसे नाही, तर पाऊस कधी पडणार आहे, किती पडणार आहे आणि त्याचा पिकांवर काय परिणाम होणार आहे, याची माहिती शेतकऱ्यांना वेळेवर मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आज सुरू होत असलेले कृषी स्वयंचलित हवामान केंद्र अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून पर्जन्यमान, वातावरणाचे तापमान, हवेतील आर्द्रता, जमिनीपासुन ३ व १० मीटर उंचीवरील वाऱ्याचा वेग व दिशा, हवेचा दाब, प्रकाश संश्लेशणाकरीता ऊपयुक्त सौर प्रारण, प्रखर सुर्यप्रकाशाचे तास, मृदेतील १०, ३०, ७० व १०० सेमि. खोलीवरील ओलावा व तापमान, यांसारख्या महत्वाच्या हवामान घटकांची स्वयंचलित, नियमित आणि शास्त्रीय पद्धतीने नोंद उपलब्ध होईल. या प्रत्यक्ष हवामान निरीक्षणांचा उपयोग स्थानिक हवामान परिस्थिती समजून घेण्यासाठी तसेच हवामान अंदाजाची पडताळणी करण्यासाठी होणार आहे. आपण अनेकदा पाहतो की, शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज मिळतो; परंतु त्या अंदाजानुसार आपल्या शेतामध्ये नेमके काय करावे, याबाबत मार्गदर्शन मिळणे अधिक महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता नसेल, तर पिकांना उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर कसा करावा? पावसाची शक्यता असल्यास खतांची मात्रा किंवा फवारणीचे नियोजन कसे करावे? तापमान आणि आर्द्रतेतील बदलामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यास कोणती काळजी घ्यावी? अशा प्रश्नांची उत्तरे ग्रामीण कृषि मौसम सेवा, मुळदे यांच्यामार्फत दिल्या जाणा-या हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ल्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे.

मुळदे येथील या हवामान केंद्रातून प्राप्त होणाऱ्या स्थानिक हवामान निरीक्षणांचा हवामान अंदाज आणि हवामान अंदाजावर अधारीत कृषी सल्ला निर्मितीमध्ये योग्य वापर केल्यास अशा सल्ल्याची स्थानिक उपयुक्तता, विश्वासार्हता आणि अचूकता निश्चितच वाढविण्यास मदत होईल. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात, आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. पावसातील खंडाच्या काळात पाणी व्यवस्थापन, आच्छादनाचा वापर, संरक्षित सिंचन, पर्यायी पीक नियोजन आणि आपत्कालीन पीक नियोजन याबाबत शास्त्रीय मार्गदर्शन करता येईल. यामुळे शेतकऱ्यांना केवळ हवामानाची माहिती मिळणार नाही, तर हवामानातील संभाव्य बदलांचा विचार करून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. शेतीतील अनावश्यक खर्च कमी करणे, उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे आणि संभाव्य पीक नुकसानीची तीव्रता कमी करणे यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर, आजच्या काळात हवामान अंदाज हा केवळ माहिती देण्याचा विषय राहिलेला नाही, तर तो शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचा आणि शेतीच्या शाश्वततेचा महत्त्वाचा आधार बनला आहे. त्यामुळे या केंद्रातून मिळणारी माहिती केवळ नोंदवहीपुरती मर्यादित न राहता तिचा उपयोग संशोधन, हवामान विश्लेषण, पीकनिहाय कृषी सल्ला आणि शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर माहिती पोहोचविण्यासाठी झाला पाहिजे. यासाठी ग्रामीण कृषी मौसम सेवा, विद्यापीठातील विविध संशोधन विभाग, कृषी विज्ञान केंद्रे आणि कृषी विभाग यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. आपल्या विद्यापीठाचे संशोधन हे प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे. या दृष्टीने कृषी स्वयंचलित हवामान केंद्र हे हवामानविषयक संशोधन आणि शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष हित यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला. या केंद्राची उभारणी करण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व शास्त्रज्ञांचे, अधिकारी आणि कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदनही त्यांनी केले. या केंद्रातून निर्माण होणाऱ्या माहितीचा शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रभावी वापर होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हवामानाची अचूक माहिती, वेळेवर कृषी सल्ला आणि योग्य वेळी योग्य निर्णय’ हाच हवामान अनिश्चिततेच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतीला सुरक्षित करण्याचा प्रभावी मार्ग आहे. या शुभेच्छांसह या कृषी स्वयंचलित हवामान केंद्राच्या कार्यास त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

 

*कृषी स्वयंचलित हवामान केंद्राचे महत्वः*

कृषी स्वयंचलित हवामान केंद्राच्या प्रत्यक्ष हवामान निरीक्षणांचा उपयोग हवामान अंदाजाची पडताळणी व स्थानिक परिस्थितीनुसार कृषी हवामान सल्ल्याची अचूकता वाढविण्यासाठी होईल. विशेषतः पावसातील खंड, अनियमित पर्जन्यमान आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पेरणी, पीक व्यवस्थापन, सिंचन नियोजन आणि पीक संरक्षणाबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांना या माहितीचा मोठा लाभ होईल. हवामानातील अनिश्चिततेच्या काळात शेतकऱ्यांना केवळ हवामानाची माहिती देणे नव्हे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम करणे, हेच या केंद्राचे खरे उद्दिष्ट आहे. या केंद्रामुळे ग्रामीण कृषी मौसम सेवेला अधिक शास्त्रीय, अचूक आणि शेतकरीभिमुख दिशा मिळेल, “हवामानाचा अचूक वेध, कृषी सल्ल्याचा योग्य मेळ आणि शेतकऱ्यांच्या निर्णयाला शास्त्रीय बळ — हेच या कृषी स्वयंचलित हवामान केंद्राचे खरे महत्त्व आहे.”

 

मुळदे येथे कृषी-स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटनावेळी विद्यापीठाचे डॉ. संजयकुमार तोरणे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेचे प्रमुख तथा उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी यांच्या विशेष उपस्थीती होती, तसेच विद्यापीठाच्या कृषिविद्या विभागाचे प्रमुख, डॉ. अशोककुमार चव्हाण, ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेचे मुख्य प्रकल्प अन्वेषक डॉ. वैभव राजेमहाडीक व फोंडाघाट कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. विजय शेट्ये हेही आवर्जुन उपस्थीत होते, विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्राचे प्रक्षत्र अधिकारी डॉ. अरुण माने, कुलगुरू महोदय यांचे तांत्रिक अधिकारी डॉ मंदार खानविलकर यांचीही सहउपस्थिती होती, त्याचबरोबर सदर उद्घाटना कार्यक्रमाकरीता महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव श्री. विलास यादव व त्यांचे सहकारी, श्री, ज्ञानेश्वर सावंत, श्री, तुकाराम खरात, त्यांचे सहकारी मजुर यांनी परिश्रम घेतले, तसेच महाविद्यालयातील स्थापत्य अभियंता श्री. ईर्शाद मुलाणी व त्यांचे सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले, उद्घाटनावेळी महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थीत राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेचे तांत्रिक अधिकारी डॉ. यशवंत मुठाळ व हवामान निरीक्षक श्री. भुषण पाटील यांच्या अथक परीश्रमातुन हा कार्यक्रम पार पडला.